स्पर्धेत जिंकणे किंवा हारणे महत्वाचे नाही, सहभाग आवश्यक आहे-भाग्यश्री आत्राम

गोंडवाना विद्यालयात सैनिकोत्सवाचा समारोप

गडचिरोली : खरं तर कोणताही खेळ हा आनंद वाटावा आणि थोडी शारीरिक कसरत व्हावी म्हणून खेळायचा असतो. पण आपण त्याला प्रमाणपत्राची जोड लावून दिली. जिंकला तरच समाजात किंमत असेल, हारणाऱ्याला कुणी विचारत नाही. असं काहीसं आपण ऐकत आलोय. त्यामुळे आपण जगण्यातली मजाच अनुभवायला विसरून गेलोय. कोणत्याही खेळात एकच जिंकणारा असतो, हे सत्य आहे. मग अशा ठिकाणी चिंता करण्याचं काय कारण ? म्हणून जिंकणे आणि हारणे यापलीकडचा विचार करून सहभाग घेतल्याचा आनंद लुटता आला पाहिजे. आयुष्य खूप मौल्यवान आहे, ते असं चिंतेमध्ये, जिंकण्या-हारण्याच्या स्पर्धेमध्ये व्यर्थ न घालवू नका, असे मोलाचे मार्गदर्शन माजी जि.प.अध्यक्ष तथा भगवंतराव मेमोरियल शिक्षण संस्था अहेरीच्या अध्यक्ष भाग्यश्री आत्राम हलगेकर यांनी केले.

येथील गोंडवाना सैनिकी विद्यालयाच्या प्रांगणात १७ व्या सैनिकोत्सवमधील क्रीडा स्पर्धेच्या समारोपीय कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. गोंडवाना सैनिकी विद्यालय नेहमीच क्रीडा क्षेत्रात अव्वल असते, त्यांनी आता राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धेपर्यंत सुद्धा मजल मारून देशाचा नावलौकिक वाढवावा, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून गडचिरोलीचे माध्यमिक शिक्षणाधिकारी वैभव बारेकर तर प्रमुख अतिथी म्हणून विद्यालयाचे प्राचार्य संजीव गोसावी, मित्र माती फाऊन्डेशनचे संचालक अंकुश गांगरेड्डीवार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लीलाधर भरडकर, दंत चिकित्सक डॉ.साई खरे, उपप्राचार्य ओमप्रकाश संग्रामे, पर्यवेक्षक अजय वानखेडे, क्रीडा प्रशिक्षक भुपेंद्र चौधरी, विद्यालय नायक हर्ष उके प्रामुख्याने उपस्थित होते.

या चार दिवसीय क्रीडा स्पर्धांमध्ये सैनिकी शाळेतील चारही हाऊसने सहभाग नोंदविला. यामध्ये कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, हँडबॉल, रस्साखेच, रिले इत्यादी सांघिक खेळ तर रनिंग, कॅरम, लांब उडी, उंच उडी, रायफल शुटिंग, चेस, थाळीफेक, गोळा फेक, भाला फेक, कराटे, इत्यादी वैयक्तिक खेळ खेळल्या गेले. संपूर्ण स्पर्धेमधून सुभाषचंद्र बोस हाऊसचा वर्ग ११ चा कॅडेट मास्टर रितेश भाकरे हा ऑल राउंडर खेळाडू म्हणून निवडल्या गेला. त्याचा मान्यवरांच्या हस्ते मेडल व ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला. प्रसंगी उत्तम कामगिरी करणाऱ्या क्रीडा मार्गदर्शकांचा सत्कार देखील यावेळी करण्यात आला.

कार्यक्रमाचे संचालन रहीम पटेल यांनी केले. प्रास्ताविक वाचन ओमप्रकाश संग्रामे यांनी तर आभार गणेश बावनकुळे यांनी मानले.