गडचिरोली तालुक्यातील मरेगावच्या शेतकऱ्याला रानटी हत्तीने चिरडले

काँग्रेस म्हणते, वनाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा

गडचिरोली : गेल्या महिनाभरापेक्षा जास्त कालावधीपासून गडचिरोली, आरमोरी आणि धानोरा तालुक्याच्या सीमावर्ती भागात वास्तव्यास असलेल्या रानटी हत्तींनी शनिवारच्या रात्री एका शेतकऱ्याला चिरडून ठार केले. गेल्या सव्वा दोन महिन्यात रानटी हत्तींनी केलेली ही तिसरी मानवी हाणी आहे.

काही दिवसांपासून या हत्तींनी गडचिरोली तालुक्यातील गोगाव, अडपल्ली, दिभना, मौशीखांब, चांभार्डा परिसरात कापलेले धानपिक फस्त करत धानाच्या पुंजण्याची नासधूस केली होती. दरम्यान रात्री मरेगाव येथील मनोज येरमे यांच्या शेतात हत्ती शिरल्याचे कळताच त्यांनी काही शेतकऱ्यांसह शेतावर जाऊन हत्तींना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. यावेळी एका हत्तीने त्यांना चिरडून ठार केले.

यापूर्वी १६ सप्टेंबरला आरमोरी तालुक्यातील पळसगाव-डोंगरगाव रस्त्यावर हत्तींची शुटींग करणाऱ्या सुधाकर आत्राम या वनविभागाच्या चालकाला एका हत्तीने ठार केले होते. त्यानंतर १७ आॅक्टोबर रोजी गडचिरोली तालुक्यातील दिभना येथील शेतकरी होमाजी गुरनुले हे हत्तीच्या हल्ल्यात ठार झाले होते.

वनाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, काँग्रेसची मागणी

गडचिरोली जिल्ह्यात अनेक दिवसांपासून जंगली हत्ती आणि नरभक्षक वाघाच्या हल्ल्यात वाढ झाली आहे. त्यामुळे शेती आणि गावातील घरांचे प्रचंड नुकसान होत आहे. अनेक निरपराध नागरिकांचाही जीव जात आहे. वनविभागाकडे ड्रोन कॅमेरे असताना देखील जंगली हत्तीच्या वास्तव्याचे ठिकाण लोकांना कळत नाही. त्यामुळे गावात किंवा गावाशेजारी हत्ती आणि वाघ येत असल्याची पुरेपूर माहिती लोकांना मिळत नाही. याला पूर्णपणे वनविभागातील अधिकारीच जबाबदार आहेत, असा आरोप करीत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी मरेगावच्या तरुणाच्या बळीसाठी वन विभागाचे मुख्य वनरक्षक, उपवनरक्षक यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात यावा, अशी मागणी पोलिसांकडे केली आहे.