गडचिरोली : राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे 11 वे राष्ट्रीय महाधिवेशन येत्या 7 आॅगस्ट 2026 रोजी कर्नाटकची राजधानी बंगळुरूला आयोजित करण्यात आले आहे. या महाधिवेशानाला गडचिरोली ज़िल्ह्यातून जास्तीत जास्त ओबीसी बांधवांनी उपस्थित राहावे यासाठीची नियोजन बैठक कन्नमवार वॅार्डातील जगतगुरू तुकाराम महाराज सार्वजनिक वाचनालय येथे आयोजित केली होती.
ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रा.शेषराव येलेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला प्रमुख अतिथी म्हणून ओबीसी महासंघाचे ज़िल्हाध्यक्ष दादाजी चुधरी, कार्याध्यक्ष रामकृष्ण ताजने, सचिव सुरेश भांडेकर, उपाध्यक्ष पांडुरंग घोटेकर, संजय ढाकुलकर, वाचनालायचे अध्यक्ष पांडुरंग नागापुरे, दादाजी चापले, महिला अध्यक्ष मंगला कारेकर, सचिव नम्रता कुत्तरमारे आदी मंचावर उपस्थित होते.
या बैठकीत मार्गदर्शन करताना प्रा.येलेकर यांनी सांगितले की, ओबीसी महाअधिवेशनाचे उद्घाटन कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्या हस्ते होणार आहे. देशातील विविध राज्यातील मंत्री, खासदार, आमदार, ओबीसी बांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
ओबीसींची जातनिहाय जनगणना होण्यासाठी फेब्रुवारी / मार्च 2027 मध्ये होणाऱ्या जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यातील राजपत्रात जात, प्रवर्ग व ओबीसींच्या आर्थिक व सामाजिक स्थितीचे वर्गीकरण करणारा कॉलम, असे तीन कॉलम समाविष्ट करावे, अशी केंद्र सरकारला मागणी करण्यात येणार आहे. या मागणीसाठी संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान रामलीला मैदानावर ओबीसी महासंघाचे ठिय्या आंदोलन आयोजित करण्यात येणार आहे. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात गडचिरोली ज़िल्ह्यात सुद्धा ओबीसी महामोर्चाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले. जिल्हाध्यक्ष दादाजी चुधरी यांनी महाधिवेशनाला गडचिरोली जिल्ह्यातून जवळपास 300 ओबीसी बांधव जाणार असल्याचे सांगितले.
बैठकीचे संचालन रामकृष्ण ताजने यांनी, तर आभार सुरेश भांडेकर यांनी मानले. बैठकीला देवानंद कामडी, सुरेश लडके, घनश्याम जकुलवार, राजेंद्र उरकुडे, सागर म्हशाखेत्री, शंकर चौधरी, विठ्ठल कोठारे, वामन गुरनुले, विजय कुत्तरमारे, विजय गिरसावळे, मंगला खरे, प्रा.संध्या येलेकर, देवला बानबले, रेखा चुधरी, कविता दोनाडकर, प्रभाकर दोनाडकर, संध्या शिवणकर, मेघा उरकुडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
































