गडचिरोली : केंद्र शासनाच्या क्रीडा मंत्रालयामार्फत खेलो इंडिया धनुर्विद्या प्रशिक्षण केंद्र (आष्टी) अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात धनुर्विद्या (आर्चरी) खेळाचे प्रशिक्षण केंद्र मंजूर करण्यात आले आहे. या केंद्रात 30 प्रशिक्षणार्थी व एक प्रशिक्षक अशी व्यवस्था करण्यात आली आहे. या प्रशिक्षणासाठी 14 वर्षांखालील (मुले व मुली) खेळाडूंची पुढील प्रशिक्षणासाठी निवड करण्यासाठी चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे.
ही निवड चाचणी दि.31 जुलै 2026 रोजी सकाळी 8 वाजता महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ हायस्कूल तथा महाविद्यालय आष्टी, ता.चामोर्शी येथे होणार आहे. या निवड चाचणीतून पात्र खेळाडूंची खेलो इंडिया आर्चरी प्रशिक्षण केंद्रातील नियमित प्रशिक्षणासाठी निवड केली जाणार आहे.
निवड चाचण्यांमधून काय तपासणार?
निवड चाचणीसाठी सहभागी खेळाडूंनी जन्म प्रमाणपत्र, आधार कार्ड, बोनाफाईड प्रमाणपत्र व पासपोर्ट आकाराचे छायाचित्र सोबत आणणे आवश्यक आहे. या निवड प्रक्रियेमध्ये काही चाचण्या घेतल्या जाणार आहेत, त्यात धावणे, हृदयगती चाचणी, बो हँड होल्डिंग, पुश-अप, सिट-अप, सिट अँड रिच, प्लँक टेस्ट, व्हर्टिकल जंप, ब्रॉड जंप, कौशल्य चाचण्या, मानसिक क्षमता चाचण्या आदी घेतल्या जाणार आहेत.
राज्यात गुणवंत तिरंदाज घडविण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. या प्रशिक्षणातून भविष्यात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय तसेच 2028 व 2032 च्या ऑलिम्पिक स्पर्धांसाठी खेळाडू तयार होण्यास मदत होणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र खेळाडूंनी या निवड चाचणीत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे यांनी केले आहे.
































