गडचिरोली : शासकीय विज्ञान महाविद्यालय गडचिरोली, बॉल बॅडमिंटन फेडरेशन ऑफ इंडिया, दि महाराष्ट्र बॉल बॅडमिंटन असोसिएशन व बॉल बॅडमिंटन असोसिएशन गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 6 ते 10 जानेवारी 2024 या दरम्यान वरिष्ठ राष्ट्रीय बॉल बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत पुरुष गटात प्रथम क्रमांक इंडियन रेल्वे संघाने, द्वितीय आंध्र प्रदेश, तृतीय तामिळनाडू, तर चतुर्थ क्रमांक कर्नाटक संघाने पटकावला. तसेच महिला गटात प्रथम क्रमांक कर्नाटक, द्वितीय तामिळनाडू, तृतीय क्रमांक केरळ तर चतुर्थ क्रमांक आंध्र प्रदेश संघाने पटकावला.
पुरुषांच्या जवळपास 30 तर महिलांच्या 26 संघांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला. या स्पर्धेत जम्मू-काश्मीर, लदाख, कर्नाटक, तामिळनाडू, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड इत्यादी राज्याच्या संघांनी सहभाग नोंदविला. अतिशय उत्साहाच्या वातावरणात ही राष्ट्रीयस्तरीय स्पर्धा संपन्न झाली.
या बक्षिस वितरण समारंभास प्रमुख अतिथी म्हणून गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्य तनुश्री धर्मरावबाबा आत्राम तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शासकीय विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॅा.प्रशांत जाकी होते. याशिवाय बॉल बॅडमिंटन फेडरेशन ऑफ इंडियाचे महासचिव वाय राजाराव, गोंडवाना विद्यापीठाच्या क्रीडा संचालिका डॅा.अनिता लोखंडे, कार्मेल हायस्कूलच्या प्रि-प्रायमरी सेक्शनच्या इन्चार्ज प्रिया रोहनकर, बॉल बॅडमिंटन असोसिएशनचे कार्याध्यक्ष डी.एस. गोसावी, बॉल बॅडमिंटन फेडरेशन ऑफ इंडियाच्या कार्यकारी सदस्य प्रा.रुपाली पापडकर, महेंद्रसिंग धोनी क्रिकेट अकॅडमी नागपूरचे संचालक मंगेश राऊत, तसेच बॉल बॅडमिंटन फेडरेशन ऑफ इंडियाचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे संचालन डॅा.राकेश चडगुलवार, प्रास्ताविक आयोजन समितीचे अध्यक्ष प्रा.ऋषिकांत पापडकर तर आभार बॉल बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष ओमप्रकाश संग्रामे यांनी मानले.