अन्न, वस्त्र, निवाऱ्यासोबत आता रस्तेही झाले मुलभूत गरज – प्रणय खुणे

अहेरी तालुका पत्रकार संघटनेकडून सत्कार

अहेरी : आलापल्ली येथील राणी दुर्गावती शाळेत झालेल्या पत्रकार दिन कार्यक्रमात राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेश अध्यक्ष प्रणय खुणे यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना त्यांनी गडचिरोली जिल्हा हा अतिमागास असून अन्न, वस्त्र व निवारा यासोबत आता रस्ते हे सुद्धा मानवाच्या मुलभूत गरजांचा भाग झाले असल्याचे सांगितले.

यावेळी अतिथी म्हणून अहेरी अपर जिल्हाधिकारी विजय भाकरे, पोलिस निरिक्षक मनोज काळबांडे, मुख्याध्यापक लोणबले, अहेरी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष ऋषी सुखदेवे, मानवाधिकार संघटनेचे प्रवक्ते ज्ञानेंद्र बिश्वास, विदर्भ अध्यक्ष जावेद अली, सरपंच पप्पू नागुलवार आणि नेलगूरचे उपसरपंच उमेश मोहुर्ले मंचावर विराजमान होते.

खुणे म्हणाले, मी ग्रामसेवकाची नोकरी सोडून कंत्राटदार झालो असलो तरी माझा आवडता विषय समाजकारण आहे. माझ्या कंपनीत 300 लोक काम करतात आणि 400 किमीचे रस्ते बनविले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील रस्त्यांची अवस्था जर बघितली तर रस्त्यातच एखाद्या गरोदर महिलेची प्रसुती होऊ शकते अशी अवस्था आहे. अहेरी विधानसभा क्षेत्रात तर एका तासात पोहोचणाऱ्या वाहनांना दोन ते तीन तास लागतात. अशा अवस्थेत सरकारने लक्ष देऊन विकास करायला हवा, असे ते म्हणाले.

यावेळी पत्रकार आशिफ पठाण, शंकर दुर्गे, मुकुंद दुर्गे, भाऊ बंडमवार यांच्यासह तालुक्यातील पत्रकार, विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते.