निवडणूक निरीक्षक बदलले, पराशर यांच्याऐवजी राहुल कुमार यांच्याकडे जबाबदारी

निवडणूक विषयक तक्रारी देण्याचे आवाहन

गडचिरोली : गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी सामान्य निरीक्षक म्हणून आता राहुल कुमार (भाप्रसे) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी अनिमेष कुमार पराशर हे सामान्य निरीक्षक म्हणून जबाबदारी पाहात होते. रूजू होताच त्यांनी देसाईगंज येथे भेट देऊन व्यवस्थेचा आढावा घेतला.

निवडणूक निरिक्षक राहुल कुमार हे सर्किट हाऊस, कॉम्पलेक्स येथील मार्कंडा कक्षात मुक्कामी राहणार आहेत. त्यांचा मोबाईल क्रमांक 9420067626 असा आहे. तसेच कार्यालयीन संपर्क क्रमांक 07132-222024 असा आहे. त्‍यांच्याकडे निवडणूक विषयक कामकाजासंदर्भातील तक्रारी प्रत्यक्ष भेटून सकाळी 11 ते 12 या वेळेत देता येतील किंवा मोबाईलवर संपर्क साधता येईल.

राहुल कुमार यांनी निवडणूक निरीक्षक म्हणून रुजू होताच आरमोरी विधानसभा मतदारसंघात भेट निवडणूक व्यवस्थेची पाहणी केली. त्यांनी देसाईगंज येथील तहसील कार्यालयातील सुरक्षा कक्षाची पाहणी करुन स्ट्रॉँग रूमच्या सभोवतालचे सिसीटीव्ही कॅमेरे, विद्युत व्यवस्था, पोलिस सुरक्षा, अग्निशामक यंत्र, ईव्हीएम साठवणूक कक्ष इत्यादी व्यवस्थेबाबत आढावा घेतला. याप्रसंगी सहायक निवडणूक अधिकारी मानसी, तहसीलदार प्रिती डुडुलकर, प्रशांत गड्डम आणि इतर अधिकारी उपस्थित होते.