आष्टी-सिरोंचा मार्गामुळे बदलणार दक्षिण गडचिरोलीचा चेहरामोहरा- ना.गडकरी

धर्मरावबाबांमुळे रस्त्यासाठी एक हजार कोटी

गडचिरोली : अहेरी मतदार संघाच्या सर्वांगिन विकासाचा ध्यास घेऊन आता पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी धर्मरावबाबा आत्राम यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांची स्थानिक जनतेच्या हितासाठी सुरू असलेली धडपड आणि जनहितासाठी तत्पर भूमिका प्रेरणादायी आहे. धर्मरावबाबा आत्राम यांच्या या कार्यामुळेच आष्टी ते सिरोंचा या 140 किमीच्या रस्त्यासाठी एक हजार कोटी रुपये निधी देण्यात येत आहे, असे केंद्रीय परिवहन व महामार्ग विभाग मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केले. यावेळी त्यांनी महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना, म्हणजे धर्मरावबाबा आत्राम आणि डॅा.मिलिंद नरोटे यांना निवडून देऊन विकासाच्या वाटचालीत आपले योगदान देण्याचे आवाहन उपस्थितांना केले.

गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना महायुतीचे उमेदवार डॅा.मिलिंद नरोटे आणि अहेरी विधानसभा क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार धर्मरावबाबा आत्राम यांच्यासाठी शुक्रवारी (दि.15) आष्टी येथे घेतलेल्या भरगच्च जाहीर सभेत ना.गडकरी बोलत होते. मंचावर धर्मरावबाबा आत्राम, डॅा.मिलिंद नरोटे, माजी आमदार नामदेव उसेंडी यांच्यासह महायुतीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

या सभेत बोलताना गडकरी यांनी धर्मरावबाबा आत्राम यांनी मागणी केल्याप्रमाणे आष्टी ते सिरोंचा या 140 किमीच्या रस्त्यासाठी 1 हजार कोटी रुपयांचा निधी देण्याचे जाहीर केले. हा निधी केवळ आत्राम यांची विकासाप्रती असलेली धडपड आणि कामासाठी सातत्याने घेत असलेला पुढाकार यामुळेच देत असल्याचे ना.गडकरी यांनी आवर्जून नमूद केले.

गडचिरोली जिल्हा आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास जिल्हा म्हणून ओळखला जात असला तरी जिल्ह्याला विपूल वन आणि खनिज संपदेचे वरदान लाभले आहे. सर्वाधिक खनिज संपदा असलेल्या या जिल्ह्यात उत्तम पायाभूत सुविधांची निर्मिती व्हावी यासाठी धर्मरावबाबा आत्राम यांनी आमदार आणि मंत्री म्हणून घेतलेला पुढाकार हा उल्लेखनीय आहे. आदिवासी समुदायाच्या सक्षमीकरणासाठी बाबांनी पुढाकार घेतल्याचेही गडकरी म्हणाले. निसर्ग संपदेवर आधारित उद्योगांमुळे जिल्ह्यात भरभराट येणार आहे. आज सुरजागडसारख्या लोहखनिज प्रकल्पामुळे हजारो आदिवासी युवकांना रोजगार मिळाला आहे. गोरगरीब आदिवासी समुदायाच्या जीवनात सुलभता निर्माण करणारे प्रकल्प राबवून त्यांच्या चेहऱ्यावर समाधान, आनंद निर्माण करणे हे खरे राजकारण आहे. यामध्ये धर्मरावबाबांनी आपली छाप सोडल्याचे ना.गडकरी म्हणाले.

कोणत्याही क्षेत्राचा सर्वांगिण विकास साधताना रस्त्यांचे बळकटीकरण अत्यंत आवश्यक आहे. अहेरी, आष्टी, सिरोंचा या भागातील विकासाला गती देण्यासाठी येथील रस्त्यांच्या बळकटीकरणाची गरज धर्मरावबाबा आत्राम यांनी व्यक्त केली होती. ती दूर करून त्यासाठी तब्बल एक हजार कोटीच्या भरघोस निधीची उपलब्धता करून देण्याचे केंद्रीय महामार्ग विभागमंत्र्यांनी जाहीरपणे सांगितल्याने आता या कामांना गती येणार आहे. मात्र या रस्त्याच्या कामांमध्ये वन विभागाशी संबंधित अडचणी देखील असल्यामुळे त्या सोडविण्यासाठी आपण स्वत: लक्ष देत असल्याची ग्वाही ना.गडकरी यांनी दिली.