गडचिरोली क्षेत्राच्या विकासासाठी आरोग्य, क्रीडा, शिक्षण व रोजगाराला प्राधान्य

आष्टीतील सभेत डॉ.नरोटे यांचा शब्द

गडचिरोली : महायुती व भारतीय जनता पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवून मला गडचिरोली विधानसभेसाठी उमेदवारी दिली. पक्षाच्या विश्वासाला तडा जाऊ न देता गडचिरोली विधानसभा क्षेत्राच्या विकासासाठी आरोग्य, क्रीडा, शिक्षण व रोजगाराला प्राधान्य देऊन महिला, विद्यार्थी, बेरोजगार, शेतकरी आदी सर्वसामान्य नागरिकांच्या प्रगतीसाठी झटणार, अशी ग्वाही भाजपचे गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे उमेदवार डॉ.मिलिंद नरोटे यांनी आष्टी येथील प्रचारसभेत बोलताना दिली.

गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार डॉ.मिलिंद नरोटे व अहेरी विधानसभा क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार धर्मरावबाबा आत्राम यांच्या प्रचारासाठी चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथे या जाहीर सभेचे आयोजन केले होते. या सभेला स्टार प्रचारक म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते.

यावेळी मंचावर ना.धर्मरावबाबा आत्राम, माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राकेश बेलसरे, भाजपचे ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे, विधानसभा समन्वयक प्रमोद पिपरे, रवींद्र ओल्लालवार, भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्ष गीता हिंगे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिल तिडके, भाजप ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिल पोहनकर, बबलू हकीम, रमेश भुरसे, आशिष पिपरे आदी पदाधिकारी, महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी ना.गडकरी आपल्या मार्गदर्शनात म्हणाले, गडचिरोली विधानसभा क्षेत्रात भारतीय जनता पक्षाने दिड हजार कोटींची कामे केली आहेत. ज्या क्षेत्रामध्ये शेती व उद्योगाचा विकास होतो तिथे नक्कीच प्रगती साधली जाते. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे तरुण उमेदवार डॉ.मिलिंद नरोटे यांना विजयी करा आणि आपल्या क्षेत्राच्या विकासासाठी झटणाऱ्या नेतृत्वाला निवडून विकास करा, असे आवाहन ना.गडकरी यांनी केले.