शेवटचे दोन दिवस होणार उमेदवारांची झुंबड, ७५ नामनिर्देशन अर्जांची उचल

बीआरएसपीसह एका अपक्षाचे नामांकन

 गडचिरोली : गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघात शुक्रवारपर्यंत 75 नामनिर्देशनपत्रांची उचल विविध राजकीय पक्ष आणि अपक्ष उमेदवारांनी केली. त्यापैकी केवळ दोन नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आले. त्यात हरिदास डोमाजी बारेकर (अपक्ष) आणि विनोद गुरूदास मडावी (बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्ष) या दोन उमेदवारांचा समावेश आहे. तीन दिवस सुट्या असल्याने आता मंगळवार आणि बुधवार या दोन दिवशी ईच्छुक उमेदवारांनी नामांकन दाखल करण्यासाठी झुंबड होण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडीवर नाराजी

भारतीय जनता पक्षाला सत्तेतून हद्दपार करण्यासाठी महाविकास आघाडीकडून बहुजन-आंबेडकरी पक्षांना सोबत घेऊन चालण्याचे धोरण नसल्याचे सांगत बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाने (बीआरएसपी) काँग्रेसबद्दल नाराजी व्यक्त केली. बाबासाहेबांना अपेक्षित असलेला समाज उभा करण्याच्या विचाराने बीआरएसपीकडून विनोद मडावी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले.

प्रागतिक पक्ष, महाराष्ट्र आघाडीतील अनेक पक्ष बीआरएसपीला निवडणुकीत प्रत्यक्ष समर्थन देतील, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला. नामांकन दाखल करताना पक्षाचे जिल्हा प्रभारी राज बन्सोड, जिल्हाध्यक्ष मिलिंद बांबोळे, जिल्हा उपाध्यक्ष अरविंद वाळके, पुरुषोत्तम रामटेके, प्रफुल्ल रायपुरे, महिला शहर अध्यक्ष विद्या कांबळे, रेखा कुंभारे, शोभा खोब्रागडे, नागसेन खोब्रागडे, सतीश दुर्गमवार, सरपंच देवीदास मडावी, धनराज दामले, प्रतिभा दामले, प्रकाश मडावी, सुरज मडावी प्रामुख्याने उपस्थित होते.