मृत नक्षली मनोज उसेंडीनेच केले होते हवालदार मेश्राम यांचे अपहरण

नक्षली पत्रकातून उघड, २७ ला बंद

गडचिरोली : नक्षलवाद्यांच्या विभागीय समितीचा सदस्य मनोज उर्फ कोपा उसेंडी याचा गेल्या 14 मार्च रोजी मृत्यू झाला. त्यानिमित्त नक्षलवाद्यांनी एका पत्रकातून त्याच्या कारकिर्दीवर प्रकाश टाकत येत्या 27 मार्च रोजी बंद पाळण्याचे आवाहन केले आहे. त्या पत्रकात मृत नक्षली मनोज याच्या अनेक गुन्ह्यातील सहभागांची माहिती देताना पोलिस हवालदार लालचंद मेश्राम यांचे अपहरण करून हत्या केल्याचीही कबुली दिली आहे.

समाजमाध्यमावर व्हायरल झालेल्या त्या पत्रकानुसार एटापल्ली तालुक्यातील पुर्सलगोंदी येथील रहिवासी असलेला नक्षली मनोज उसेंडी 1984 मध्ये नक्षल्यांच्या संपर्कात आला. तेव्हापासून विविध जबाबदाऱ्या सांभाळत असलेल्या मनोजने पोलिस हवालदार लालचंद मेश्राम यांचे अपहरण करून त्यांना नक्षलींकडे सोपविले होते. नंतर नक्षलींनी त्यांची हत्या केली. तेव्हापासून पोलिस नक्षली मनोज याच्या शोधात होते. यादरम्यान दि.14 मार्चला त्याचा मृत्यू झाल्याचे भाकपा (माओवादी) संघटनेच्या पश्चिम सब झोनल ब्युरोने काढलेल्या पत्रकात म्हटले आहे. सध्या तो नक्षलींच्या टेलर टिमचा इन्चार्ज होता. त्याच्यावर लाखो रुपयांचे इनामही होते, अशी माहिती आहे.