एटापल्ली : श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून समाजमन कळते. श्रम, सेवेचा संस्कार आपल्यावर होऊन विविध उपक्रम व तज्ज्ञ व्यक्तींच्या व्याख्यानातून ऊर्जा व ज्ञानप्राप्ती होते. एकत्र काम केल्याने मैत्रीभावना, सहकार्य आणि समाजसेवेचा वसा मिळतो, असे प्रतिपादन माजी जि.प. अध्यक्ष, सिनेट सदस्य तथा भगवंतराव मेमोरियल शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी केले.
भगवंतराव कला व विज्ञान महाविद्यालय एटापल्लीतर्फे राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. विशेष अतिथी म्हणून गुरुपल्ली ग्रामपंचायतचे सदस्य दशरथ अडगोपुलवार, भगवंतराव कला व विज्ञान महाविद्यालय एटापल्लीचे प्राचार्य डॉ.एस.एन. बुटे, कर्रेमचे पोलिस पाटील बाबुराव वेलादी, कर्रेमचे भूमिया नामवेद मडावी, एस.जी. कोडापे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येर्रावार आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
गावाच्या विकासात युवकांचा सहभाग हवा, सामान्य बुद्धिमत्ता असली तरी काहीही करता येते. फक्त त्याला जिद्दीची जोड हवी, असे त्या म्हणाल्या. नागरिकांनी सर्व गट-तट विसरून एक झाल्यास विकास साधता येतो, असा कानमंत्रही त्यांनी दिला.
यावेळी समृद्ध ग्राम निर्मितीमध्ये युवकांचे योगदान या विषयावर उपस्थित मान्यवरांनी मोलाचे मार्गदर्शन केले. या शिबिरात कर्रेम येथील प्रतिष्ठित नागरिक, तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सप्ताहकाळात विद्यार्थ्यांनी गावातील जि. प. शाळा, अंगणवाडी केंद्र, समाज मंदिर, विविध वस्त्यांमध्ये जाऊन स्वच्छता मोहीम राबविली.