गडचिरोली : येत्या २२ जानेवारीला अयोध्येत होत असलेल्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेचे औचित्य साधून देशभरात ठिकठिकाणच्या मंदिरांमध्ये स्वच्छता अभियान राबविले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून बुधवारी गडचिरोलीच्या कॅम्प एरियामधील हनुमान मंदिरात खासदार अशोक नेते यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी स्वच्छता केली.
हनुमान मंदिराच्या आवारात खासदार नेते यांनी आपल्या हाती झाडू व सफाईचा पोचा घेऊन साफसफाई करून मंदिर स्वच्छ केले. मंदिर स्वच्छ झाल्यानंतर काही घरांच्या भिंतीवर कमळ पोस्टर पेंटिंग करण्यात आले. त्यात खासदार अशोक नेते यांनी ‘अब की बार, फिर मोदी सरकार २०२४’ असे रेखाटून पुन्हा भाजप सरकारच्या विजयाचा संकल्प केला. कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीने कमळ पोस्टर पेंटिंग करून परिसर भाजपमय करावा असे आवाहन केले.
सदर स्वच्छता अभियानात विदर्भ संघटनमंत्री डॉ.उपेंद्र कोठेकर, भाजपा अनु.जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री खा.अशोक नेते, प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे, आमदार डॉ.देवराव होळी, जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, भाजपचे ज्येष्ठ नेते तथा लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे, लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्र ओल्लालवार, किसान आघाडीचे प्रदेश सरचिटणीस रमेश भुरसे, जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, जिल्हा महामंत्री योगिता पिपरे, भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिल पोहनकर, जिल्हा उपाध्यक्ष भारत खटी, जिल्हा उपाध्यक्ष प्रणय खुणे, जिल्हा उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, चंद्रपूर जिल्हा ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाल, माजी न.प.उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, श्रीकांत पतरंगे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.