Home दैनंदिन बातम्या फोकुर्डीतील आगीत शेतकऱ्याचे धान आणि मका जळून खाक

फोकुर्डीतील आगीत शेतकऱ्याचे धान आणि मका जळून खाक

शेतातील झोपडीला अचानक आग

चामोर्शी : तालुक्यातील फोकुर्डी येथे रविारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत शेतातील झोपडी आणि त्यात ठेवलेले सर्व साहित्य जळून खाक झाले. शेतकरी दत्तूजी बाबुराव झाडे यांच्या शेतातील झोपडीत साठवून ठेवलेले धान व मका आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने झाडे यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, दत्तूजी झाडे यांनी त्यांच्या शेतमालाची सुरक्षित साठवणूक म्हणून झोपडीत 45 पोते मका आणि 55 पोते धान ठेवले होते. अचानक आग लागल्याने काही क्षणातच संपूर्ण झोपडीने पेट घेतला. आग इतकी भीषण होती की झोपडीतील सर्व धान्य जळून राख झाले. या घटनेमुळे शेतकरी कुटुंबावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे.

घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. गावकऱ्यांच्या अथक प्रयत्नांमुळे आग आसपासच्या भागात पसरण्यापासून रोखण्यात यश आले. दरम्यान, अग्निशमन दलाला घटनेची माहिती देण्यात आली. मात्र माहिती उशिरा मिळाल्याने अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचेपर्यंत गावकऱ्यांनी बहुतांश आग विझवली होती.

या घटनेची माहिती फोकुर्डीचे उपसरपंच तुमदेव दहेलकर यांनी संबंधित तलाठ्याला दिली. नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तातडीची मदत मिळावी यासाठी पंचनामा करण्याची मागणी करण्यात आली. यावर तलाठी यांनी रविवार सुटीचा दिवस असत्यामुळे सोमवारी घटनास्थळी येऊन पंचनामा करण्यात येईल, असे सांगितल्याचे समजते.

या आगीत नेमके किती नुकसान झाले याचा अधिकृत आकडा पंचनाम्यानंतर स्पष्ट होणार असला तरी प्राथमिक अंदाजानुसार लाखो रुपयांचा शेतमाल जळून खाक झाला आहे. आधीच नैसर्गिक संकटे, वाढता उत्पादन खर्च आणि शेतीमालाला मिळणारा कमी भाव यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत असताना या घटनेमुळे झाडे कुटुंबावर आणखी मोठे संकट कोसळले आहे. या शेतकऱ्याला आर्थिक मदत द्यावी, तसेच आपत्ती निवारण निधीतून योग्य नुकसानभरपाई मंजूर करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.