हमीभावाने तुमचे धान विकायचे ना, मग लवकर नोंदणी करा भाऊ

दक्षिण गडचिरोलीत ३७ ठिकाणी होणार खरेदी

गडचिरोली : महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळाच्या अहेरी उपप्रादेशिक कार्यालयाने यावर्षी धान खरेदीत आघाडी घेतली आहे. अहेरी (उच्च श्रेणी) अंतर्गत खरीप पणन हंगाम 2023-24 साठी दि. 1 ऑक्टोबरपासून धान विक्रीसाठी नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. ही नोंदणी 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत सुरु राहणार आहे. विशेष म्हणजे अहेरी कार्यालयांतर्गत वेगवेगळ्या गावांमध्ये 37 खरेदी केंद्र निश्चित करण्यात आले आहे.

आदिवासी विकास महामंडळाच्या उपप्रादेशिक कार्यालय, अहेरी (उच्च श्रेणी) मार्फत यावर्षी सुरू केले जात असलेल्या खरेदी केंद्रांमध्ये मुलचेरा, अहेरी, एटापल्ली, भामरागड व सिरोंचा या पाच तालुक्यांमधील अहेरी, बोरी, कमलापूर, वेलगुर, इंदाराम, उमानूर, आलापल्ली, पेरमिली, जिमलगट्टा, देचलीपेठा, मुलचेरा, सिरोंचा, झिंगानूर, असरअल्ली, अमरादी, अंकिसा, वडधम, पेंटीपाका, जाफ्राबाद, रोमपल्ली, बामणी, विठ्ठलरावपेठा, भामरागड, लाहेरी, ताडगांव, कोठी, मन्नेराजाराम, एटापल्ली, गट्टा, तोडसा, घोटसुर, कसनसुर, जारावंडी, गेदा, हालेवारा, कोटमी आणि हेडरी अशा एकूण 37 खरेदी केंद्रांचा समावेश आहे.

खरीप हंगाम 2023-24 मध्ये धान विक्रीसाठी शेतकऱ्यांनी त्यांच्या लगतच्या आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या खरेदी केंद्राशी संपर्क साधुन ऑनलाईन नोंदणी करावी. त्यासाठी सातबारा, आधार कार्ड, नमुना 8 अ, चालु बँक पासबुक व इतर आवश्यक दस्तावेज घेऊन स्वत: हजर राहून ऑनलाईन नोंदणी करुन शासनाच्या आधारभुत किंमत खरेदी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन अहेरीचे उपप्रादेशिक व्यवस्थापक बी.एस.बरकमकर यांनी केले आहे.