कोनसरी लोहप्रकल्प विस्तारीकरणाला नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद

रोजगारासह विविध सुविधांची अपेक्षा

गडचिरोली : जिल्ह्यातील पहिला मोठा उद्योग ठरलेल्या लॅायड्स मेटल्स अॅन्ड एनर्जी लि.च्या कोनसरी येथील लोहप्रकल्पाच्या विस्तारीकरणासाठी गुरूवारी (दि.23) प्रकल्पस्थळी पर्यावरणावरील जनसुनावणी पार पडली. यावेळी विस्तारीकरणांतर्गत येणाऱ्या गावांमधील नागरिकांनी कंपनीच्या विस्तारीकरणाचे स्वागत केले. आमचा प्रकल्पाला विरोध नाही, पण स्थानिक नागरिकांना रोजगारासह आरोग्य आणि शिक्षणासारख्या महत्वाच्या सुविधा पुरवा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

या जनसुनावणीला जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, लाॅयड्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बी.प्रभाकरन, माजी मंत्री तथा अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मरावबाबा आत्राम, गडचिरोलीचे आमदार डॉ.मिलिंद नरोटे, माजी खासदार अशोक नेते, माजी आमदार डॅा.देवराव होळी, पद्मश्री डॉ.परशुराम खुणे, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या चंद्रपूर विभागाचे प्रादेशिक अधिकारी तानाजी यादव, उपप्रादेशिक अधिकारी उमाशंकर भदुले यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

कोनसरी येथील स्टील प्लान्टचे विस्तारीकरण करून तो 2 बाय 4.5 दशलक्ष टन प्रतिवर्ष (ग्राईंडिंग युनिट), 10 दशलक्ष टन प्रतिवर्ष थिकनिंग फिल्ट्रेशन युनिट आणि 2 बाय 4 दशलक्ष टन प्रतिवर्ष आयरन ओर पेलेट प्लान्ट, तसेच इंटेग्रेटेड स्टील प्लान्ट (4.5 दशलक्ष टन प्रतिवर्ष क्षमता) एवढा वाढविण्याकरिता ही जनसुनावणी घेण्यात आली.

या जनसुनावणीत परिसरातील गावांमधील नागरिकांनी उत्साहाने सहभागी होऊन माओवादग्रस्त असलेल्या या जिल्ह्यात कंपनीमुळे विकासाचा सूर्य उगवल्याचे सांगितले. पर्यावरण, रोजगार व प्रकल्पाच्या परिणामांबाबत अनेकांनी आपले सकारात्मक मत मांडले. उद्योगाचा विस्तार होताना प्रदूषण वाढू नये याकरिता कंपनीने सुरू केलेल्या इलेक्ट्रिक वाहनांच्या ताफ्यासह, सांडपाणी व्यवस्थापनाच्या सोयीचे कौतुक केले. मात्र उद्योगातून कुठल्याही प्रकारचे प्रदूषण होऊ नये व त्याचा त्रास जनसामान्यांना होऊ नये, यासाठी विशेष काळजी घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली. सुरजागड खाणीतून निघालेल्या लोहखनिजावर हा प्रकल्प आधारीत असल्याने येथे स्थानिकांनाच रोजगार द्यावा, प्रकल्पबाधित होत असलेल्या गावांना योग्य मोबदला देऊन या गावांचा मॉडल व्हिलेज अर्थात आदर्श, आधुनिक आणि सर्व सुविधायुक्त गावांप्रमाणे विकास करावा, सर्व प्रकल्पबाधित गावांना सर्व प्रकारच्या सुविधा द्याव्या, मल्टिस्पेशलिटी हॉस्पिटलची निर्मिती करावी, सीबीएसई अभ्यासक्रमाची शिक्षणाचा उत्तम दर्जा असलेली शाळा निर्माण करावी, पर्यावरणविषयक आवश्यक सर्व उपाययोजना कराव्या, जमीनी दिलेल्या शेतकऱ्यांना कंपनीने आर्थिक भरपाई देतानाच कंपनीचे शेअर द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली.

गडचिरोली जिल्ह्यात आजवर माओवाद्यांच्या भितीने कुणीच उद्योग उभारण्याची हिंमत केली नाही. पण या कंपनीने साहसी पाऊल उचलत जिल्ह्यात उद्योगाच्या रूपात विकासाची पहाट आणली. हजारो रिकाम्या हातांना काम दिले. त्यामुळे हजारो कुटुंबांना सुखाचे दिवस आले. त्यामुळे आम्ही कंपनीतील प्रकल्पांच्या विस्तारीकरणाचे स्वागत करतो, पण आमच्या महत्त्वाच्या मागण्या पूर्ण कराव्या, असा एकूण जनसुनावणीतील नागरिकांचा सूर होता.

गडचिरोली आता विकासाचे नवे मॅाडेल- नेते

यावेळी विचार व्यक्त करताना माजी खासदार अशोक नेते म्हणाले, गडचिरोलीचा कायापालट व मागासलेला जिल्हा म्हणून ओळख पुसण्याचे काम लाॅयड्सने केले आहे. गडचिरोली जिल्हा आता विकासाचे नवे मॉडेल बनेल. गडचिरोली भविष्यात ‘पोलाद सिटी’ म्हणून ओळखले जाईल. या प्रकल्पामुळे स्थानिक तरुणांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होऊन औद्योगिक विकास वेगाने होईल, असा विश्वास नेते यांनी व्यक्त केला.

आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनीही लाॅयड्स कंपनीमुळे जिल्ह्यात समृद्धी आल्याचे सांगत येथील पोलाद निर्मितीमुळे जगात देशाची पोलादी देश अशी प्रतिमा निर्माण होईल, असे सांगितले. आमदार डॅा.मिलिंद नरोटे यांनीही कंपनीमुळे जिल्ह्यातील बेरोजगारीची समस्या सुटत असून उद्योगातील सांडपाणी व इतर अनावश्यक घटकांची विल्हेवाट लावणारी यंत्रणा उत्तम दर्जाची ठेवावी अशी अपेक्षा व्यक्त केली. पद्मश्री डॅा.परशुराम खुणे यांनीही उद्योगविहीन असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील या एकमेव उद्योगाचा विस्तार झाल्यास जिल्ह्यात विकास, सुख, समृद्धीचाही विकास होईल, असे सांगितले.

दरम्यान खासदार डॅा.नामदेव किरसान यांनीही जनसुनावणीला भेट देऊन प्रकल्पाची पाहणी करत गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासंदर्भात कंपनी करत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. या जनसुनावणीला पंचक्रोशीतील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व हजारो ग्रामस्थांची उपस्थिती होती.