आरमोरीतील गोटुल महोत्सवामुळे आदिवासी संस्कृतीचा जागर- नेते

प्रबोधनाची दिशा मिळाल्याचे प्रतिपादन

आरमोरी : आदिवासी संस्कृतीचे संवर्धन व समाज प्रबोधनाच्या उद्देशाने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गोटुल बहुउद्देशीय समिती आणि आदिवासी विद्यार्थी संघ तालुका शाखा आरमोरी यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य गोटुल महोत्सवाचे आयोजन केले होते. वडसा रोडवरील गोटुल बहुउद्देशीय समितीच्या पटांगणावरील या महोत्सवाने आरमोरीच्या सांस्कृतिक वातावरणाला एका वेगळ्या उंचीवर नेले. या निमित्ताने आदिवासी संस्कृतीचा जागर होत असल्याचे प्रतिपादन माजी खासदार तथा भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

या गोटुल महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे आदिवासी विकासमंत्री अशोक उईके यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी खा.डॉ.नामदेव किरसान, आ.डॉ.मिलींद नरोटे, माजी आ.कृष्णा गजबे, माजी आ.डॉ.नामदेव उसेंडी, आ.रामदास मसराम, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम आदी मान्यवर उपस्थित होते.

आदिवासी संस्कृतीचे दर्शन

उद्घाटन सोहळ्याप्रारंभी पारंपरिक गोंडी नृत्याचे सादरीकरण झाले. आदिवासी समाजाच्या समृद्ध परंपरेचा ठसा उमटवणाऱ्या या नृत्याला उपस्थित मान्यवरांनी भरभरून दाद दिली. मंत्री आणि मान्यवरांनी आदिवासी संस्कृतीच्या वारशाचे महत्त्व अधोरेखित करत समाजप्रबोधनासाठी अशा महोत्सवांच्या भूमिकेचे कौतुक केले.

कार्यक्रमाची वैशिष्ट्ये

22 जानेवारीला आदिवासी देवतांच्या महापूजेद्वारे या महोत्सवाला प्रारंभ झाला. यावेळी कबड्डी, व्हॉलीबॉल स्पर्धा, रक्तदान शिबिर, मोफत रोगनिदान शिबिर यासारख्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

समाज प्रबोधनाची दिशा

23 जानेवारीला आदिवासी समाज प्रबोधन मेळावा झाला. यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना माजी खा.अशोक नेते यांनी आदिवासी समाजाच्या प्रगतीसाठी भारतीय जनता पक्षाने केलेल्या कार्यावर सविस्तर भाष्य केले. “देशाच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची निवड ही भारतीय जनता पक्षाच्या आदिवासी समाजप्रेमाची साक्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘जनजाती गौरव दिन’ साजरा करून आदिवासी समाजाचा सन्मान वाढवला आहे. तसेच स्वातंत्र्य संग्रामातील आदिवासी वीरांच्या स्मारकांची उभारणी करून त्यांचे योगदान उजागर केले जात आहे, असे ते म्हणाले.

गोटुल महोत्सवाची यशस्वी मांडणी

गोटुल महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा.दौलत धुर्वे, प्रा.दिलीप कुमरे, सामाजिक कार्यकर्ते दिलीप घोडाम, सरपंच प्रदीप कुमरे, प्रभाकर हलामी, राजू परसा यांच्यासह अनेकांनी मोलाचे योगदान दिले. हा महोत्सव केवळ एक सांस्कृतिक सोहळा नसून आदिवासी समाजाच्या प्रगतीचा व जागृतीचा प्रेरणादायी स्त्रोत ठरला आहे.