वनजमिनीवरील 6 पुलांसह 33 केव्ही उपकेंद्राच्या बांधकामाचा मार्ग मोकळा

जिल्हा वनहक्क समितीच्या बैठकीत परवानगी

गडचिरोली : वनजमिनीमुळे मंजुरीच्या प्रतीक्षेत प्रलंबिल असलेल्या जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागातील गावांना जोडणाऱ्या 6 लहान पुलांसह एका 33 केव्ही वीज उपकेंद्राच्या बांधकामाला मंजुरी देण्यात आली. प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय वनहक्क समितीचे अध्यक्ष विजय भाकरे यांनी ही मंजुरी दिली. त्यामुळे या बांधकामांचा मार्ग मोकळा झाला आहे.

मंजुरी मिळालेल्या पूल आणि जोड रस्त्यांमध्ये दुब्बागुडा- दामरंचा रस्त्यामधील बांडिया नदीवरील पूल आणि जोड रस्त्याचे बांधकाम, तसेच भाडभिडी-घोट-रेगडी-कसनसुर-गट्ट- कोठी-आरेवाडा- भामरागड ते राज्य सीमा रस्त्यावरील 5 लहान पुलांचे बांधकाम आणि पिरमिली येथील 33 केव्ही वीज उपकेंद्राच्या बांधकामाला जिल्हास्तरीय वनक्क समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. यामुळे वनकायद्याच्या अडचणीत सापडलेल्या या पुलांच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे.

जिल्हास्तरीय वनहक्क समितीची सभा प्र.जिल्हाधिकारी भाकरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल, पूनम पाटे तसेच वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी 6 नवीन व अपील प्रकरणातील एका वनहक्काचे दावे मंजूर करण्यात आले. तर 2 नवीन आणि 7 अपील प्रकरणातील दावे फेरचौकशीसाठी पाठविण्यात आले. यासोबतच 46 वनहक्कधारकांच्या सुधारित वनहक्क पट्टे तयार करण्यास मान्यता देण्यात आली. या बैठकीत वनविभाग व महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.