गडचिरोली : जिल्ह्यातील युवक-युवतींना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध करून देण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सदैव तत्पर आहे. २०२३ या वर्षात दुर्गम आणि अतिदुर्गम भागातील युवक-युवतींना १० हजार नवीन रोजगार आणि स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याचे उद्दीष्ट असून या संधीचा लाभ घेऊन युवा वर्गाने आपल्या कुटुंबियांचे जीवनमान उंचवावे, असे आवाहन अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता यांनी केले.
पोलीस दलाच्या प्रोजेक्ट उडान सर्वंकष सक्षमीकरणांतर्गत युवकांना विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जात आहे. त्याअंतर्गत सुरक्षा रक्षक प्रशिक्षण दिलेल्या ३८ युवकांच्या निरोप समारंभप्रसंगी ते बोलत होते. पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनात आणि जिल्हा कौशल्य विकास विभागाच्या सहकार्याने आयोजित या प्रशिक्षणासाठी ५० पुरूष प्रशिक्षणार्थ्यांनी आॅनलाईन पद्धतीने नोंदणी केली होती. त्यापैकी ३८ प्रशिक्षणार्थ्यांनी यात सहभाग घेतला. २० मार्च ते २० मे अशा ६० दिवसांच्या या निवासी प्रशिक्षणात पोलीस दलात कार्यरत असलेल्या कवायत प्रशिक्षकांमार्फत मैदानी चाचणी प्रशिक्षण आणि आंतरवर्ग प्रशिक्षण देण्यात आले.
समारोपीय समारंभाला अपर पोलीस अधीक्षक कुमार चिंता, कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त योगेश शेंडे प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक धनंजय पाटील व अंमलदारांनी परिश्रम घेतले.