एकाच दिवशी ९२१२ जणांना दिला सरकारी योजना व सेवांचा लाभ

गोविंदपुरात शासन आले दारी, महाराजस्व अभियानाचे यश

लाभार्थ्याला ट्रॅक्टरची चावी देताना अधिकारीगण.

गडचिरोली : एरवी विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी अनेकांना शासकीय कार्यालयांच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात. पण सध्या महसूल विभागामार्फत राबविल्या जात असलेल्या महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून शासनच आपल्या दारी येऊन योजनांचा लाभ देत आहे. गडचिरोली तालुक्यातील गोविंदपूर येथे दि.१९ ला झालेल्या या अभियानात एकाच दिवशी तब्बल ९२१२ जणांना विविध सरकारी योजना आणि सेवांचा लाभ देण्यात आला.

या उपक्रमाचे उद्घाटन राहुल मीणा (आयएएस) यांनी केले. प्रास्ताविक गडचिरोली तहसील कार्यालयाचे पुरवठा अधिकारी जगदीश बारदेवाड यांनी यांनी केले. यावेळी शासनाच्या विविध योजनांबाबत राहुल मीणा आणि सहा.जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ.मैनक घोष (आयपीएस) यांनी मार्गदर्शन करून नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. यावेळी पं.स.चे पशुधन विकास अधिकारी पी.एन. काळे, शिवानी आश्रमशाळा गोविंदपूरच्या मुख्याध्यापिका श्रीमती इटवले, वाकडीच्या सरपंच सरिता चौधरी, दर्शनिमालच्या सरपंच जयपाला दुधबावरे, येवलीचे उपसरपंच प्रितम गेडाम तसेच इतर विभागातील तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे नियोजन जिल्हाधिकारी संजय मीणा व उपविभागीय अधिकारी डॉ.मैनक घोष यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोलीचे तहसीलदार महेंद्र गणवीर यांनी केले. त्यासाठी नायब तहसीलदार प्रियंका मानकर, नायब तहसीलदार ज्ञानेश्वर ठाकरे (संगायो), येवलीचे मंडळ अधिकारी लेनगुरे, तसेच मंडळातील सर्व तलाठी व कोतवाल यांनी सहकार्य केले.

असा मिळाला योजनांचा लाभ
गोविंदपूर येथील अभियानाची तयारी म्हणून 1 एप्रिलपासून नागरिकांकडून अर्ज भरुन घेण्यात आले होते. नागरिकांनी सीएससी केंद्रामार्फत शासनाच्या विविध योजना व सेवांमध्ये 85 जात प्रमाणपत्र, 821 उत्पन्नाचे दाखले, 61 वय व अधिवास प्रमाणपत्र, 11 नॉनक्रिमिलीअर, 1631 शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र, 8 संजय गांधी योजना, 22 श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांची दुरुस्ती करण्यात आली. कामगार विभागाने 10 नागरिकांना कामगार कार्ड वाटप केले. यावेळी आरोग्य विभागाने 213 नागरिकांची आरोग्य तपासणीही केली. आयुष्यमान कार्ड 1773 बनवून नागरिकांना वाटप करण्यात आले. केंद्र शासन पुरस्कृत बँकामार्फत राबविण्यात येणाऱ्या सामाजिक सुरक्षा योजनेमध्ये पीएम सुरक्षा योजनेचे 16 तर पीएम जीवन ज्योती योजनेचे 18 अर्ज नागरिकाकडून भरुन घेण्यात आले. येवली मंडळातील सर्व ग्रामपंचायतीमार्फत विविध 74 दाखल्यांचे वितरण करण्यात आले. 7 नागरिकांना वीज जोडणी देण्यात आली. तसेच विविध योजनांची माहिती व जनजागृती अभियानस्थळी करण्यात आली.