आष्टी : कोनसरी गावातील वाढता दारूचा ओघ आणि त्यातून उद्ध्वस्त होणाऱ्या कुटुंबांना पाहून ग्रामपंचायतीने दारूबंदीच्या अंमलबजावणीसाठी गावात दारूमुक्त समितीचे गठण केले. या समितीने रात्री 2 वाजतापासून पहारा देऊन पाळत ठेवली. अखेर रविवारी पहाटे 4:30 वाजतादरम्यान या समितीला दारू पकडण्यात यश आले. गावात दारूचा पुरवठा करणाऱ्या एका व्यक्तीला 35 लिटर मोहाच्या दारूसह पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. त्याचे दुचाकी वाहनही जप्त करण्यात आले.
दारू विक्री करून गावातील युवकांचे बळी घेणाऱ्या दारू विक्रेत्यांनी दारू विक्रीला आळा घालावा, यापुढे ते दारू पुरवठा किंवा विक्री करताना सापडल्यास दारूमुक्त समिती त्यांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन करतील. याशिवाय ग्रामपंचायतकडूनही दंडात्मक कारवाई केली जाईल, अशा इशारा यावेळी दारू विक्रेत्यांना देण्यात आला.
यासाठी कोनसरीचे सरपंच श्रीकांत पावडे, उपसरपंच रतन आक्केवार, पोलीस पाटील यशवंत मानापुरे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष चंद्रकांत सोनटक्के, दारूमुक्ती समितीचे सदस्य रवींद्र कावळे, जयवंत कोवे व इतर सदस्यांनी सहकार्य केले. सर्व सरपंचांनी गावात मताचे राजकारण करण्यापेक्षा गावाच्या विकासासाठी कार्य करावे आणि विकासाच्या आड येणाऱ्यांना धडा शिकवावा, असे आवाहन यावेळी सरपंच पावडे यांनी केले.