गडचिरोली : अहेरी येथील पोलीस संकुलातील नवीन शासकिय निवासस्थान तसेच उपपोस्टे झिंगानूर येथील नवीन प्रशासकिय इमारतीचे उद्घाटन तथा झिंगानूर येथे भरगच्च जनजागरण मेळाव्याचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. यानिमित्ताने सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी दुर्गम भागाला भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. लोकशाही सशक्त करण्यासाठी गडचिरोली पोलीस दलातर्फे राबविल्या जात असलेले उपक्रम स्तुत्य आहेत अशा शब्दात त्यांनी पोलीस दलाचे कौतुक केले.

८०० पेक्षा जास्त नागरिकांच्या उपस्थितीत झालेल्या या जनजागरण मेळाव्यासाठी आलेल्या अतिथींचे स्वागत आदिवासी पारंपरिक नृत्याने करण्यात आले. प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनानंतर मान्यवरांच्या हस्ते विविध साहित्याचे वाटप करण्यात आले. त्यात शिलाई मशीन, स्प्रे-पंप, विद्यार्थ्यांना नोटबुक, पुस्तके, छत्र्या, क्रिकेटच्या बॅट-बॅाल, व्हॅालीबॉल, व्हॅालीबॉल नेट, तसेच महिलांना साड्या व मुलींना सायकलींचे वाटप करण्यात आले. नागरिकांना जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला अशी शासकीय कागदपत्रेही वाटण्यात आली. यावेळी नक्षलविरोधी अभियानासाठी वापरल्या जात असलेल्या अत्याधुनिक साधनांची पाहणी न्या.गवई यांनी केली.
या कार्यक्रमाला उच्च न्यायालयाचे न्या.अतुल चांदूरकर, न्या.संजय मेहरे, न्या.महेंद्र चांदवानी, न्या.संजय मेहरे, पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हाधिकारी संजय मीना, पोलीस अधीक्षक निलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) यतिश देशमुख, एटापल्लीचे एसडीपीओ सुदर्शन राठोड, सिरोंचाचे एसडीपीओ सुहास शिंदे उपस्थित होते.


































