पोलिसांनी पकडला १५ लाखांचा गांजा, छत्तीसगडमधून आणताना कारवाई

चारचाकी वाहन जप्त, दोन आरोपींना अटक

सिरोंचा : जिल्ह्यात अलिकडच्या काही दिवसात गांजा तस्करीच्या कारवाया वाढल्या आहेत. त्यानंतरही तस्करी सुरूच असून रविवारी एका वाहनातून येत असलेला तब्बल १५ लाखांचा दिडशे किलो गांजा पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. यातील दोन आरोपींना अटक करून गाडी जप्त करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनात अंमली पदार्थ तस्करीवर झालेली ही अलिकडच्या काळातील सर्वात मोठी कारवाई आहे.

प्राप्त माहितीनुसार, सिरोंचा तालुक्यातील आसरअली ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजेश गावडे यांना छत्तीसगड राज्यातून चारचाकी वाहनाने अंमली पदार्थ (गांजा) असरअल्लीकडे येत असल्याची गोपनिय माहिती मिळाली होती,. त्यानुसार त्यांनी असरअल्ली ते पातागुडम रोडवरील वनविभागाच्या नाक्याजवळ सापळा लावला. त्या संशयित वाहनास थांबविण्याचा प्रयत्न केला असता, वाहन चालकाने वाहन न थांबविता ते रस्त्याच्या खाली उतरविले. यानंतर वाहनातील एक महिला व एका पुरुषाने पळ काढला. पण पोलीस पथकाने त्यांचा पाठलाग करुन मोठ्या शिताफीने त्यांना पकडले.

सदर कारची तपासणी केली असता कारच्या मागील डिक्कीमध्ये गांजाने भरलेले ३६ लहान बॉक्स आढळले. त्यात अंदाजे १५० किलो अंमली पदार्थ (गांजा) होता. त्याची किंमत अंदाजे १५ लाख रुपये आहे. सदर गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहन (रेनॉल्ट डस्टर) क्रमांक एमएच ३४, एएम ५५०१ मिळून अंदाजे २० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी शिव विलास नामदेव आणि ज्योती सत्येंद्र वर्मा, दोन्ही रा.उत्तरप्रदेश यांचेविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास असरअल्लीचे प्रभारी अधिकारी सपोनि राजेश गावडे करीत आहेत.

या कारवाईसाठी पोलीस अंमलदार जगन्नाथ कारभारी, दिलीप ऊईके, शंकर सलगर, आदिनाथ फड यांनी सहकार्य केले.