संत नरहरी पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त सोनार समाजबांधव एकवटले

शहरातून रॅलीसह विविध उपक्रम

गडचिरोली : स्थानिक सोनार समाज सेवा संस्थेच्या वतीने २८ फेब्रुवारी रोजी बुधवारला संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथीचा सोहळा आयटीआय चौक परिसर, पंचवटी नगरातील संत नरहरी महाराज मंदिराच्या नियोजित जागेत पार पडला. यावेळी संत नरहरी महाराजांची पालखी व रॅली काढण्यात आली. या सोहळ्यानिमित्त गडचिरोली शहर व परिसरातील सोनार समाज बांधव एकवटल्याचे दिसून आले.

कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून भ्रष्टाराचारविरोधी जनआंदोलन समितीचे जिल्हाध्यक्ष विजय खरवडे, तर अध्यक्षस्थानी सोनार समाज सेवा संस्थेचे अध्यक्ष नितीन हर्षे होते. मुख्य अतिथी म्हणून वैरागड ग्रामपंचायतच्या सदस्य शीतल सोमनानी, विशेष अतिथी म्हणून चांगदेव फाये, सोनार समाज धानोराचे अध्यक्ष अजय हाडगे, आरमोरीचे अध्यक्ष पंकज खरवडे, देसाईगंजचे अध्यक्ष पंढरी कावळे, वैरागडचे अध्यक्ष अरुण हर्षे, चामोर्शीचे अध्यक्ष चंदन खरवडे, कुरखेडाचे अध्यक्ष शिवकुमार वडीकर आदी मान्यवर उपस्थित होते.

सर्वप्रथम मंदिराच्या नियोजित जागेवर घटस्थापना करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर सकाळी ११ वाजता कार्यक्रम स्थळापासून चंद्रपूरमार्गे श्रीराम मंदिर ते इंदिरा गांधी चौक, चंद्रपूर रोड मार्गे बाईक रॅली काढण्यात आली. त्यानंतर कृष्णा पोगळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी समाजबांधवांना संबोधित केले. समाजाच्या अधिकार व हक्कासाठी, तसेच विकासासाठी समाज एकसंघ राहिला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

प्रास्ताविक प्रा.राकेश इनकणे, संचालन गजेंद्र डोमळे यांनी, तर आभार युवा समितीचे अध्यक्ष प्रा.स्वप्निल ढोमणे यांनी मानले. कार्यक्रमासाठी तानाजी पालकर, रमेश भरणे, अलका खरवडे, वृषाली हर्षे यांच्यासह इतर समाजबांधवांनी सहकार्य केले.

या ज्येष्ठांचा झाला सत्कार

सदर सोहळ्यामध्ये सोनार समाजातील ज्येष्ठ नागरिकांचा शाल, श्रीफळ व संत नरहरी महाराज यांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये रामभाऊ खरवडे, मनोहर कारेमोरे, सरिता खरवडे, क्षीरसागर डोमळे, मुरलीधर हर्षे, पुंडलिकराव हर्षे, दुधराम डोमळे, नत्थुजी हर्षे आदींचा समावेश आहे.

हे ठरले स्पर्धेतील विजेते

सदर सोहळ्यात नृत्य, गीतगायन तसेच वेशभूषा आदी स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये विजेत्या ठरलेल्या प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाच्या उमेदवारांना बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. गीतगायनमध्ये प्रथम क्रमांक विजया पोगळे, द्वितीय तुळशीदास कारेमोरे, नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक रितिका खरवडे, द्वितीय नीरा नागरे, वेशभूषेमध्ये मिलिंद हर्षे, मनीष हर्षे यांनी क्रमांक पटकाविला.

गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

दहावीच्या परीक्षेत प्रावीण्य मिळविल्याबदल रिंकू डुबरे, संस्कृती चावरे, सृष्टी बेहरे तसेच बारावीमधील शेजल बेहरे, युजीसी परीक्षेतील निकिता येवले, राज्यस्तरीय रंगभरण स्पर्धेत पहिला क्रमांक प्राप्त ओर्वी इनकने आदींचा गौरव करण्यात आला.