गडचिरोली : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवार व राजकीय पक्ष यांनी आयोगाने ठरवून दिलेल्या मर्यादेत व नियमानुसार खर्च करणे आवश्यक आहे. निवडणुकीदरम्यान केलेल्या प्रत्येक खर्चाची व्यवस्थित व सुयोग्य नोंद ठेवण्याच्या सूचना निवडणूक खर्च निरीक्षक एस.वेणू गोपाल यांनी दिल्या आहेत.
वेणू गोपाल यांनी निवडणूक निरीक्षक कार्यालयात उमेदवारांच्या निवडणूक खर्च लेख्यांचे निरीक्षण केले. यावेळी निवडणूक खर्चाचे नोडल अधिकारी तथा कॅफो हेमंत ठाकूर, डेप्युटी सीईओ चेतन हिवंज आणि खर्च निरीक्षण पथक तसेच उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
प्रचार सभेत उमेदवार व पक्ष यांचा सुक्ष्म अभ्यास करुन खर्चाचे वर्गीकरण करणे, तालुकास्तरावर दुय्यम शॅडो रजिष्टर अद्यावत करणे, तसेच उमेदवारांच्या प्रत्येक सभा, बैठका, रॅलीचे चित्रीकरण निवडणूक आयोगाच्या नियमानुसार करणे आदी सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या. निवडणूक लेख्याचे पुढील निरीक्षण 8 एप्रिल रोजी करण्यात येणार आहे. त्यानंतर 17 एप्रिल रोजी निवडणुक खर्च लेख्यांचे निरीक्षण केले जाणार आहे. त्याअनुषंगाने संबंधित लेखे अद्ययावत ठेवण्याचे व कोणत्याही प्रकारची हयगय होऊ नये याची दक्षता घ्यावी, अशा सूचना जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी दिल्या आहेत.