रेतीच्या ट्रकांमुळे रस्त्याची दुरवस्था, कंत्राटदारानेच दुरूस्ती करावी

अपर जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश

गडचिरोली : अहेरी तालुक्यातील मोदुमतुर्रा रेतीघाटावर डम्पिंग केलेल्या १७०० ब्रास रेतीच्या वाहतुकीसाठी क्षमता नसलेल्या रस्त्यावरून जड वाहनांचा वापर केल्याने रस्ता खराब झाला. यासाठी रेती वाहतूक करणाऱ्या कंत्राटदाराला जबाबदार धरून अहेरीचे अपर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी सात दिवसात रस्ता दुरूस्त करून देण्याचा आदेश रेती वाहतूकदार कंत्राटदाराला दिला. एवढेच नाही, तर जड वाहनांमधून रेतीची वाहतूक बंद करण्यासही सांगितले.

चामोर्शी येथील सुरज बंडू श्रीरामे असे त्या वाहतूकदार कंत्राटदाराचे नाव आहे. मोदुमतुर्रा रेतीघाटावर साठवून ठेवलेल्या रेतीची श्रीरामे यांच्याकडून दररोज २२ चाकी वाहनांमधून वाहतूक केली जात असल्याने अबनपल्ली ते संड्रा या रस्त्याचे मोठे नुकसान झाल्याचे सांगत, ही जड वाहतूक थांबवून आवश्यक उपाययोजना करावी, असा अहवाल प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या कार्यकारी अभियंत्यानी २८ फेब्रुवारीला दिला होता. त्यानुसार दुसऱ्या दिवशी अपर जिल्हाधिकाऱ्यांनी कंत्राटदार सुरज श्रीरामे यांना त्यांचे म्हणणे सादर करण्यासाठी मोबाईलवर नोटीस पाठविली होती. पण श्रीरामे यांनी कोणताही खुलासा केला नाही.

वास्तविक कमी भार क्षमतेच्या रस्त्यावर अतिशय जास्त भार क्षमतेच्या वाहनांमधून वाहतूक करणे गंभीर आणि सार्वजनिक उपद्रव निर्माण करणारी बाब असल्याने कार्यकारी अभियंत्यांचा अहवाल, तसेच तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्याच्या अहवालाच्या आधारे अपर जिल्हाधिकारी भाकरे यांनी तो रस्ता तातडीने दुरूस्त करण्याचा आणि यापुढे जड वाहनांमधून रेती वाहतूक न करण्याचा आदेश दिला.