गडचिरोली : देशाचे राष्ट्रपती हे देशाचे घटनात्मक प्रमुख असतात. परंतु संसद भवनासारख्या देशातील प्रमुख वास्तूचे लोकार्पण करताना त्यांना डावलने हा राष्ट्रपती पदाचाच नाहीतर ज्या आदिवासी समाजामधून राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू आल्या आहेत, त्या आदिवासी समाजाचा आणि संविधानाचाही अपमान आहे. त्यामुळे स्वनामधन्य व्यक्तिमत्व असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह त्यांच्या अधिपत्याखालील यंत्रणेचा आम्ही जाहीर निषेध करतो, अशी भावना आदिवासी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष छगन शेडमाके यांनी व्यक्त केली.
भारतीय संविधानानुसार राष्ट्रपतीपद हे देशातील सर्वोच्च पद आहे. त्यामुळे सर्वोच्च सभागृह असलेल्या संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते होणे अपेक्षित होते. परंतु त्या आदिवासी समाजातील असल्यामुळे तर त्यांना या सन्मानापासून दावलण्यात आले नाही ना? अशी शंका शेडमाके यांनी व्यक्त केली. या प्रकाराचा निषेध करण्यासाठी आदिवासी काँग्रेस रस्त्यावर उतरेल असा इशाराही त्यांनी दिला आहे.