जिल्ह्यातील तीन पोलीस अधिकारी पश्चिम महाराष्ट्रात

गडचिरोलीसह अहेरी व धानोराच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निरोप

गडचिरोली : गडचिरोलीसारख्या आव्हानात्मक परिस्थितीत काम करून आपला पोलीस दलातील प्रशासकीय सेवेचा कार्यकाळ पूर्ण केलेल्या तीन पोलीस अधिकाऱ्यांना मंगळवारी (दि.२३) जिल्हा पोलील दलाच्या वतीने निरोप देण्यात आला. त्यात गडचिरोलीचे एसडीपीओ प्रणिल गिल्डा (बदलीचे ठिकाण मिरज, जि.सांगली), अहेरीचे एसडीपीओ अमोल ठाकूर (बदली कराड, जि.सातारा) आणि धानोराचे एसडीपीओ स्वप्निल जाधव (बदली दौंड, जि.पुणे) या तीन अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

पोलीस मुख्यालयातील एकलव्य हाॅलमध्ये झालेल्या निरोप समारंभात पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी तीनही पोलीस अधिकाऱ्यांनी गडचिरोली जिल्ह्यात केलेल्या सेवेबाबत मनोगत व्यक्त करून गडचिरोली जिल्ह्यातील अनुभव सांगितले. पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात तीनही उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना पुढील पाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाला अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अहेरी यतिश देशमुख, तसेच कुरखेडाचे उपविभागीय पोलीस अधिकारी साहील इतरकर, पेंढरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी मयुर भुजबळ आणि सर्व शाखा प्रभारी अधिकारी उपस्थित होते.