गडचिरोली : जिल्ह्यात ठिकठिकाणी महसूल विभागाच्या वतीने महाराजस्व अभियानाअंतर्गत शासकीय योजनांची जत्रा भरवली जात आहे. विविध शासकीय योजना व सेवांचा लाभ नागरिकांना देण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ या संकल्पनेतून ही जत्रा भरवली जात आहे. हा उपक्रम जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने राबविला जावा यासाठी प्रत्येक जत्रेच्या (कार्यक्रमाच्या) आयोजनासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दोन लाख रुपयांची तरतूद केली, पण तालुकास्तरिय यंत्रणेकडून प्रत्यक्षात मोजकेच पैसे खर्च करून उर्वरित रक्कम वाढीव बिलाच्या माध्यमातून लाटण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप आदिवासी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष छगन शेडमाके यांनी केला आहे.
जिल्ह्याच्या ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय योजना आणि सेवांचा जास्तीत जास्त लाभ मिळावा या चांगल्या उद्देशाने या जत्रांचे आयोजन अनेक ठिकाणी केले जात आहे. या प्रत्येक जत्रेसाठी दोन लाखापर्यंत खर्चाची तरतूद असताना प्रत्यक्षात एक लाखाच्या आतच खर्च केला जात असल्याचे दिसून येते. यात संबंधित तहसीलदार किंवा महसूल यंत्रणेकडून अधिकचे बिल जोडून शासकीय निधीचा अपहार केला जाण्याची शंका शेडमाके यांनी उपस्थित केली आहे.
या जत्रांसाठी केलेल्या तरतुदीतून लाऊड स्पीकर, मंडप, नागरिकांच्या नाश्त्याची व्यवस्था, आणि प्रचार प्रसिद्धी या सर्वांवर मिळून दोन लाख रुपये खर्च करायचे आहेत. प्रत्यक्षात मात्र एवढा खर्च केलाच जात नसल्याचे दिसून येते. कमी खर्च करून बिलं मात्र जास्त रकमेचे जोडण्याचा हा प्रकार तालुकास्तरीय यंत्रणेसाठी पैसे लाटण्याचे माध्यम होत असल्याची टीका शेडमाके यांनी केली आहे. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी योग्य ती चौकशी करावी अशीही मागणी त्यांनी केली आहे.