नोकरी हवी की स्वयंरोजगार उभारणार? चला देसाईगंजला

26 ला करिअर मार्गदर्शनासह रोजगार-स्वयंरोजगार मेळावा

देसाईगंज : बेरोजगार युवा वर्गाला नोकरीची संधी देण्यासोबत स्वयंरोजगार उभारण्यास मार्गदर्शन देण्यासाठी देसाईगंज येथे येत्या 26 मे रोजी मेळाव्याचे आयोजन केले आहे. यात विविध कंपन्या, महामंडळे नोकरीसाठी युवकांची निवड करतील. तसेच करिअरबद्दल मार्गदर्शनही केले जाणार आहे.देसा

ईगंज येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शुक्रवार दि.26 मे रोजी सकाळी 10 वाजता ‘छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मेळाव्या’चे आयोजन करण्यात आले आहे. सदर मेळाव्याचे उद्घाटन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी जे.पी.लोंढे, मुख्याधिकारी डॉ.कुलभूषण रामटेके, पोलिस निरीक्षक किरण रासकर, तसेच विशेष अतिथी म्हणून भारतीय स्टेट बँक देसाईगंज शाखेचे व्यवस्थापक राजू मुंडे, ए.ए. एनर्जी लि.चे व्यवस्थापक आफताब आलम खान, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.अविनाश मिसार आदी उपस्थित राहणार आहेत.

या मेळाव्यात दहावी आणि बारावीनंतर शिक्षणाच्या संधी, व्यक्तिमत्व विकास व मुलाखतीचे तंत्र, कृषि क्षेत्रामध्ये स्वयंरोजगाराच्या संधी, आयटीआय तसेच महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया, उच्च शिक्षणाच्या संधी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. रोजगार आणि स्वयंरोजगार व शिक्षण पूर्ण करण्यासाठी कर्जांच्या विविध योजनांविषयी बँकेचे अधिकारी सुद्धा मार्गदर्शन करणार आहेत. आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सैन्य दलामध्ये नोकरीच्या विविध संधी आणि अग्निवीर योजनेविषयी माहिती दिली जाणार आहे. जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी आणि पालकांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा व्यवसाय व प्रशिक्षण अधिकारी वैभव बोंगिरवार आणि कार्यक्रमाचे आयोजक संस्थेचे प्राचार्य सुरेश चौधरी यांनी केले आहे.

रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन
औद्योगिक प्रशिक्षण संस्था देसाईगंज आणि जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, तथा मॉडेल करिअर सेंटर गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्याचेही आयोजन केले आहे. सदर रोजगार मेळाव्यामध्ये नामांकित कंपन्या, महामंडळे उपस्थित राहणार आहे. ईच्छूक उमेदवारांनी स्वत:चा बायोडाटा, आधार कार्ड, शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या झेराॅक्स प्रतिसह, दि.26 मे रोजी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत उपस्थित राहून रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.