समाजाच्या प्रगतीसाठी विज्ञानाचे महत्त्व खूप मोठे : भाग्यश्री आत्राम

सिरोंचा येथे विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन

सिरोंचा : आपल्या समाजाच्या प्रगतीसाठी विज्ञान हे खूप महत्त्वाचे आहे. विज्ञानाची कास धरूनच समाजाला चांगली प्रगती साधता येते, असे प्रतिपादन माजी जि.प.अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम यांनी केले. बुधवारी (दि.१०) रोजी सिरोंचा तालुका मुख्यालयातील मॉडेल हायस्कूल येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार जितेंद्र शिकतोडे, विशेष अतिथी म्हणून गटविकास अधिकारी अनिलकुमार पटले, पशुधन विकास अधिकारी विकास घोडे, प्रमुख अतिथी म्हणून तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.मनोहर कन्नाके, गटशिक्षणाधिकारी निलकंठम दोंतुला, विस्तार अधिकारी एस. बी. टेकुल, केंद्र प्रमुख रमेश रच्चावार, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्ष व्यंकटलक्ष्मी अरवेली, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य रवी रालाबंडीवार, नगरसेविका सपना तोकला, माहेश्वरी पेद्दापल्ली, नगरसेवक रंजित गागापूरवार, सतीश राचर्लावार, चिंतारवेलाच्या सरपंच राजलक्ष्मी कंडेला, राष्ट्रवादी काँग्रेसचे सिरोंचा तालुका उपाध्यक्ष सत्यम पिडगू, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष एम डी शानू, सत्यनारायण चिलकामारी, रवी सुलतान, विविध शाळांचे मुख्याध्यापक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा अनेक कलागुण आहेत. त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. मात्र त्याची ओळख विज्ञान प्रदर्शनातूनच होते. त्यातूनच विद्यार्थ्यांना विज्ञानाची आवड सुद्धा निर्माण होते. शिक्षकांनी सुद्धा त्यादृष्टीने प्रयत्न करण्याचे आवाहन भाग्यश्रीताईंनी केले. यावेळी विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केले. गटशिक्षणाधिकारी यांनी प्रस्ताविकातून विज्ञान प्रदर्शनाचे महत्व सांगितले.

या विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक विभाग गटातून ९१, माध्यमिक विभाग गटातून ६८, शिक्षक शैक्षणिक साहित्य गटाच्या प्राथमिक विभागातून ११, माध्यमिक विभागातून ४ तर प्रयोगशाळा परिचर गटातून ४ मॉडेल्स मांडण्यात आले होते. पाहु्ण्यांनी विविध मॉडेल्सची पाहणी केली.

कार्यक्रमाचे संचालन एस बी कुळसंगे यांनी तर आभार प्रदर्शन सत्यम दुर्गम यांनी केले.