मेंदूची क्रियाशिलता वाढविणारी ‘विस्डम ऑफ माईंड’ कार्यशाळा

गोंडवाना विद्यापीठात उद्घाटन

गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाच्या पदव्युत्तर शैक्षणिक मराठी विभागाच्या वतीने ‘विस्डम ऑफ माईंड’ या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन बुधवारी करण्यात आले.

कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यशाळेला मुख्य मार्गदर्शक म्हणून मानसशास्राचे तज्ज्ञ जितेंदर कुमार, मानव विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.चंद्रमौली, मराठी विभागाचे समन्वयक डॉ.श्याम खंडारे, योगेश श्रावण यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

मस्तिष्क आणि मेंदूची क्रियाशिलता वाढविण्याबद्दल हजारो लोकांना प्रशिक्षित करणारे जितेंदर कुमार यांनी यावेळी स्मृतीशास्त्र, एकाग्रता तंत्र, ध्यान तंत्र, लक्ष केंद्रित करण्यासाठी करायचा व्यायाम, क्रियाकलाप, जटिल माहितीसाठी प्रगत स्मृतीशास्त्र, सुधारित एकाग्रतेसाठी वेगवान वाचन अशा अनेक बाबींची विस्तृत माहिती देऊन उदाहरणासह या विषयावर प्रकाश टाकला.

यावेळी कुलगुरु डॉ.प्रशांत बोकारे म्हणाले, ही कार्यशाळा प्रत्येकाला त्याचे मानसिक आरोग्य सुदृढ करण्यासाठी खूप मदतीची आहे. जर संपूर्ण एकाग्रतेने याचा लाभ घेतला तर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात उपयोगी पडेल अशी महत्वपूर्ण माहिती यात मिळेल. मेंदूची क्रियाशिलता वाढविणारी ही कार्यशाळा आहे. इतरांवर दोषारोपण करण्यापेक्षा आपण कसे चांगले बनू यासाठीचे हे प्रशिक्षण असल्याचे ते म्हणाले.

प्रास्ताविक मराठी विभागाच्या सहा प्रा.डॉ. सविता सादमवार यांनी तर संचालन जनसंवाद विभागाचे स.प्रा.सरफराज अन्सारी यांनी केले.