अहेरी उपविभागातील कर्मचाऱ्यांना लागली शिस्त, पुढच्यास ठेच मागचा शहाणा

शिवसेनेचा (उबाठा) एसडीओंना पाठिंबा

गडचिरोली : अहेरी उपविभागातील सहकारी कर्मचाऱ्यांना शिस्तीच्या बाबतीत वठणीवर आणण्यासाठी उपविभागीय अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी वैभव वाघमारे यांनी एेतिहासिक पाऊल उचलले. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये मोठा बदल होऊन नागरिकांची कामेही लवकर होऊ लागली आहेत. याबद्दल शिवसेनेच्या (उबाठा) वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

जिल्ह्यातील अहेरी, एटापल्ली आणि सिरोंचा हे महसूल उपविभाग अत्यंत अविकसित, मागासलेले व सर्वच स्तरावर दुर्लक्षित आहेत. या क्षेत्रात कार्यरत कर्मचारी हे शासकीय कामाकडे गांभिर्याने न बघता वेळकाढूपणा करतात. त्यामुळेच या भागातील नागरिकांची कामे वर्षानुवर्षे तशीच पडून राहतात. ही बाब नवनियुक्त उपविभागीय अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी वैभव वाघमारे यांनी बरोबर हेरली आणि त्यांना शिस्त लावण्यासाठी वेळेचे बंधन घातले. यासाठी त्यांनी स्वत:च्या कार्यालयातच नेहमी उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करत अद्दल घडविली. यामुळे सर्वच कर्मचारी वठणीवर आले आहेत. एसडीओ वाघमारे हे स्वत: जनतेची कामे वेळेत करण्याकडे लक्ष देत आहेत. यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अहेरी विधानसभा क्षेत्राच्या वतीने एसडीओ वैभव वाघमारे यांची भेट घेऊन अभिनंदन करत त्यांना पाठिंबा दर्शविला.

यावेळी शिवसेना जिल्हा सहसंपर्क प्रमुख विलास कोडापे, उपजिल्हा प्रमुख अरुण धुर्वे, विधानसभा संघटक बिरजु गेडाम, युवासेनेचे जिल्हा प्रमुख दिलीप सुरपाम, उपजिल्हा प्रमुख स्वर्णसिंग डांगी, राजू मामीडवार, अनिल सराफावार, युवासेना उपजिल्हाधिकारी राकेश मुन्नमवार, विलास सिडाम, चंदना बिष्णोई, अक्षय गहेरवार, सोने सलामे इत्यादी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.