शालेय विद्यार्थ्यांना सायकली तर दिव्यांग बांधवांना तीनचाकी सायकलचे वाटप

माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांचा पुढाकार

अहेरी : टायगर ग्रुप श्री गणेश उत्सव समिती आल्लापल्लीतर्फे क्रीडा संकुल परिसरात गणेश उत्सव साजरा केला जात आहे. या उत्सवात दररोज विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून माजी जि.प. अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम यांच्याकडून शालेय विद्यार्थ्यांना सायकल, दिव्यांग बांधवांना तीनचाकी सायकली, तसेच महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.

टायगर ग्रुपच्या सदस्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत भाग्यश्री आत्राम यांनी शालेय विद्यार्थ्यांना सायकल, दिव्यांग बांधवांना तीन चाकी सायकल आणि भाविकांना महाप्रसाद वितरण करण्याचे ठरविले होते. त्यानुसार त्यांनी आरतीला उपस्थित राहून गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्याहस्ते दुर्गम भागातील शालेय विद्यार्थ्यांना सायकल, दिव्यांग बांधवांना तीन चाकी सायकल वाटप केल्या.

टायगर ग्रुप श्री गणेश उत्सव समितीतर्फे पहिल्यांदाच क्रीडा संकुल आवारात गणेश उत्सव साजरा केला जात आहे. या ठिकाणी मेला लागल्याने नागरिकांची मोठी गर्दी दररोज होत आहे. विशेष म्हणजे येथील भव्य केदारनाथ देखावा नागरिकांचे आकर्षण ठरत आहे. भाग्यश्री आत्राम यांनी उपस्थित भक्तांशी आस्थेने संवाद साधत महाप्रसाद वितरण केले.

यावेळी आलापल्लीचे प्रथम नागरिक शंकर मेश्राम, राष्ट्रवादी काँग्रेसचे अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येरावार, ग्रा.पं. सदस्य मनोज बोल्लूवार, सदस्य सोमेश्वर रामटेके, अनुसया सप्पीडवार आदी प्रामुख्याने उपस्थित होते.