गडचिरोली : देशातील प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी, न्यायमूर्ती यांनी राज्यघटनेप्रमाणे काम करावं, मालकाच्या आदेशाप्रमाणे नव्हे, असे आवाहन राजकीय विश्लेषक व अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक प्रा.श्याम मानव यांनी केले. संस्था, संघटनांच्या सहकार्याने आणि अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुढाकाराने सोमवारी (दि.१२) गडचिरोलीतील शिवाजी महाविद्यालयाच्या प्रांगणात त्यांचे व्याख्यान झाले. ‘लोकशाहीसमोरील आव्हाने’ असा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता.
गडचिरोलीवासीयांनी जबाबदारीचे भान ठेवून व नजीकच्या भविष्यात लोकशाहीला वाचविण्याचा संकल्प करावा. लोकशाहीच्या संरक्षणासाठी संकल्प करणे आणि लोकशाही वाचवणे ही काळाची गरज आहे. लोकांनी निश्चितपणे आपली भूमिका बजावली पाहिजे, असे प्रा.श्याम मानव म्हणाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष डॉ.शिवनाथ कुंभारे तर प्रमुख अतिथी म्हणून माजी खासदार मारोतराव कोवासे, माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, ज्येष्ठ पत्रकार रोहिदास राऊत, काँग्रेसचे हसनअली गिलानी, चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष ॲड.गोविंद भेंडारकर, सुरेश झुरमुरे व गडचिरोली जिल्हाध्यक्ष मनोहर हेपट प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रा.मानव यांनी आपल्या व्याख्यानात लोकशाही समोर कोणती आव्हाने उभी आहेत त्याबद्दल अनेक उदाहरणे देऊन नागरिकांचे प्रबोधन केले. सरकारची चुकीची ध्येयधोरणे, नीती याबद्दल त्यांनी जनतेला पटवून दिले. महात्मा गांधींनी मनुस्मृती मोडीत काढण्याचा प्रयत्न केला होता, बाबासाहेबांनी मनस्मृती जाळली होती, तीच मनुस्मृती पुन्हा लादली जाऊ द्यायची का, असा प्रश्न त्यांनी जनतेला केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष मनोहर हेपट यांनी तर अभियानाची भूमिका सुरेश झुरमुरे यांनी प्रस्तुत केली. कार्यक्रमाचे संचालन प्रा.संध्या येलेकर तर आभार प्रदर्शन विलास निंभोरकर यांनी केले.
या कार्यक्रमासाठी जनअधिकार मंच, श्री गुरुदेव सेवा मंडळ, जिल्हा सर्वोदय मंडळ, महाराष्ट्र अंनिस, जिल्हा विकास संशोधन व कार्यान्वयन संस्था, मुव्हमेंट फॉर जस्टिस, जन्गो रायतड आदिवासी महिला संघटना, संविधान फाउंडेशन, जिल्हा माळी समाज संघटना, मराठा सेवा संघ, राष्ट्रीय ओबीसी महासंघ, शहीद वीर बाबुराव शेडमाके स्मारक समिती अभिवादन संस्था, महिला मैत्री संघ, सम्यक समाज समिती व इतर अनेक संघटनांनी या कार्यक्रमासाठी सहकार्य केले.