रानटी हत्तींची वक्रदृष्टी आता रबीच्या पिकांवर, उसेगावच्या जंगलात मांडले ठाण

कोंढाळानजीकच्या शेतात साहित्याची तोडफोड

गडचिरोली : रानटी हत्तींच्या कळपाने उसेगाव, शिवराजपूर परिसरात ठाण मांडले आहे. रबी हंगामातील धान व इतर पिकांवर या हत्तींची नजर आहे. सोमवारच्या रात्री या हत्तींनी कोंढाळा गावालगतच्या शेतात शिरून पिकांसह पाण्याच्या पाईपची तोडफोड केली.

दोन दिवसांपूर्वी चिखली रिठ गावालगत आलेल्या हत्तींना पांगवण्यात वनविभागाला यश आले होते. रविवारी रात्री अरततोंडी जंगलातून हा कळप उसेगाव जंगल परिसरात दाखल झाला. सोमवारी सकाळी कोंढाळा जंगलाच्या कक्ष क्रमांक 58 मध्ये हा कळप आल्याने वनविभागाने नागरिकांना सतर्क करत जंगलात जाऊ नये, हत्तींना हुसकावण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन केले. यादरम्यान एका शेतात शिरल्याने पाणी पुरवठ्यासाठी लावलेल्या पाईपचे नुकसान झाले.