जयश्री खोंडे यांच्यासह जिल्ह्यातील चार शिक्षक राज्यस्तरीय पुरस्काराचे मानकरी

मुंबईत ५ सप्टेंबरला होणार सन्मान

गडचिरोली : शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करण्यासोबत विविध उपक्रम राबवून सामाजिक योगदान देणाऱ्या शिक्षकांना राज्य शासनाच्या वतीने दरवर्षी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले शिक्षक गुणगौरव या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित केले जाते. यावर्षी त्यासाठी जिल्ह्यातील चार शिक्षकांची निवड झाली आहे. त्यात अहेरी येथील धर्मराव शिक्षण मंडळाअंतर्गत धर्मराव कृषी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय अहेरीच्या सहाय्यक शिक्षिका जयश्री खोंडे यांचा समावेश आहे. येत्या ५ सप्टेंबर या शिक्षक दिनी मुंबईत त्यांना या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

या आधी खोंडे यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना विविध सामाजिक संस्थांनी विविध पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. याशिवाय त्यांनी अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग घेतला आहे. मराठी विज्ञान परिषद, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, कृषी संशोधन, सांस्कृतिक कार्यक्रम, महिला सबलीकरण, पर्यावरणपुरक जनजागृतीचे कार्य त्या अविरतपणे करत आहेत.

या पुरस्कारासाठी निवड झालेल्या इतर शिक्षकांमध्ये मुलचेरा पंचायत समितीअंतर्गत गणेशनगर येथील जि.प.प्राथमिक शाळेचे सहा.शिक्षक सुजय जगदीश बाच्छाड, मोहुर्ली येथील जि.प.प्राथमिक शाळेचे शिक्षक अशोक धाडुजी बोरकुटे, कोरची तालुक्यातील जैतानपार जि.प.प्राथमिक शाळेचे दिलीप रावजी नाकाडे यांचा समावेश आहे.