गडचिरोली : जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील फरी (झरी) गावाजवळच्या शेताशिवारात सोमवारी निंदण करत असलेल्या एका महिलेवर नवतरुण टी-14 वाघिणीने हल्ला करून ठार केले. वाघिणीने महिलेला जबड्यात पकडून फरफटत शेजारच्या जंगलात नेले. महिलेच्या किंकाळ्या एेकून आजुबाजूच्या शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी तिकडे धाव घेतल्यानंतर वाघाने जंगलात धूम ठोकली.
या घटनेनंतर वनविभागाच्या पथकासह पोलिसही घटनास्थळी पोहोचले. पण वाघिणीचा बंदोबस्त करून शेतकऱ्यांना सुरक्षित वातावरण देत नाही तोपर्यंत मृतदेह हलवू देणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतल्याने बराच वेळ तणावाचे वातावरण होते. अखेर पोलिसांनी समजूत काढत जमावाला शांत केले. हा हल्ला करणारी वाघिणी टी-14 असून ती टी-2 या वाघिणीच्या पाच बछड्यांपैकी एक आहे. हे बछडे आता मोठे झाले असून आईपासून वेगळे झाल्यानंतर टी-14 ने केलेली ही पहिली मानवी शिकार असल्याचे वनअधिकाऱ्यांनी सांगितले.
लोकप्रतिनिधींनी धाव घेऊन दिली तातडीने मदत
फरी झरी येथील जंगलात झालेल्या वाघाच्या हल्ल्यात महानंदा दिनेश मोहुर्ले या गरीब महिलेला प्राण गमवावे लागले. याबाबतची माहिती मिळताच खासदार अशोक नेते आणि आमदार कृष्णा गजबे यांनी तातडीने देसाईगंज येथील ग्रामीण रुग्णालयात जाऊन त्या शेतकरी कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी वनविभागाच्या वतीने तात्काळ मदत म्हणून ५० हजार रुपये मृत महिलेच्या कुटुंबियांना सुपूर्द करण्यात आले.
यावेळी खासदार अशोक नेते, आ.कृष्णा गजबे यांच्यासह भाजप नेते बाबुराव कोहळे, प्रमोद पिपरे, मोतीलाल कुकरेजा, सुनील पारधी, आनंद खजांची, तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी विजय धांडे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.अविनाश मिसार, शिवशंकर कायाते, माजी नगराध्यक्ष श्याम उईके, योगेश नाकतोडे, वसंतराव दोनाडकर, सरपंच चक्रधर नाकाडे उपस्थित होते.