मुरूमगावात पकडली गांजाने भरलेली कार, तर देसाईगंजमध्ये सुगंधी तंबाखू

मुंबईतील रहिवासी तीन आरोपींना अटक

गडचिरोली : जिल्ह्यात दोन ठिकाणी पोलिसांनी केलेल्या मोठ्या कारवायांमध्ये तब्बल १४ लाखांचा गांजा आणि २३ लाखांचा सुगंधी तंबाखू जप्त केला.

१३८ किलो ५८० ग्रॅम वजनाच्या गांजा या अंमली पदार्थाने भरलेली कार छत्तीसगड सीमेकडील मुरूमगाव पोलिस मदत केंद्राच्या पथकाने पकडली. सदर होंडा सीटी कारमधील गांजा छत्तीसगड राज्यातून आणला होता. त्याची किंमत १३ लाख ८५ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. विशेष म्हणजे कारमधील तीनही लोक मुंबईचे रहिवासी आहेत. त्यामुळे हा गांजा मुंबईकडे तर नेला जाणार नव्हता ना, अशी शंका उपस्थित केली जात आहे. तीनही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून हा गांजा नेमका कुठे जाणार होता हे तपासात स्पष्ट होणार आहे.

धानोराचे उपविभागीय पोलीस अधिकारी मयुर भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस मदत केंद्र मुरुमगावचे सपोनि मिथुन सिरसाट यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक राहुल चौधरी, हवालदार नानाजी पित्तुलवार, अंमलदार दिलीप लंबुवार, तराचंद मोहुर्ले, वाल्मिक कोटांगले, विनेश मांढरे, नितीन मडावी तसेच राज्य राखीव दलाच्या तुकडीने केली.

मालवाहू वाहनातून जप्त केला २३ लाखांचा तंबाखू

देसाईगंज : सुगंधी तंबाखूवर सर्वत्र बंदी असताना गडचिरोलीसह अनेक जिल्ह्यात खर्रा बनविण्यासाठी या तंबाखूचा अनधिकृतपणे सर्रास वापर केला जातो. देसाईगंज पोलिस स्टेशनच्या पथकाने चंद्रपूर जिल्ह्यातून एका मालवाहू वाहनातून गडचिरोली जिल्ह्यात येत असलेली तब्बल २३ लाख रुपयांच्या सुगंधी तंबाखूची पाकिटे जप्त केली.

ईगल हुक्का शिशा तंबाखू असे त्या पाकिटांवर मुद्रित केलेले आहे. सुपारीसोबत हा सुगंधी तंबाखू आणि चुना घोटून त्याचा खर्रा बनविला जातो. याबाबतची माहिती पोलिसांनी अन्न व औषध प्रशासन विभागाला दिली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या निर्देशानुसार देसाईगंज ठाण्याचे पोलिस निरीक्षक रासयकर यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक ज्ञानेश्वर धनगर, तसेच दिनेश राऊत, नरेश कुमोटी, विलेश ढोके व संतोष सराटे या अंमलदारांनी केली.