देसाईगंज : गडचिरोली वनवृत्ताअंतर्गत आरमोरी जवळच्या रामाळा परिसरात दि.१९ ला ताराबाई धोडरे (रा.आरमोरी) या महिलेचा बळी घेणाऱ्या टी-13 या वाघिणीला सोमवारी बेशुद्ध करून जेरबंद करण्यात आले. गडचिरोली आणि ताडोबातील टिमकडून दोन दिवसांपासून तिचा शोध सुरू होता.
या वाघिणीचे त्या भागात वास्तव्य असल्याने रामाळा-वैरागड यामार्गावर ती नागरिकांचा पाठलाग करीत असल्याच्या तक्रारी होत्या. त्यामुळे मार्ग बंद ठेवून वनविभागाकडून सनियंत्रण केले जात होते. त्यामुळे भविष्यातील हल्ले टाळण्यासाठी वन्यजीव विभागाने तिला जेरबंद करण्याची परवानगी दिली.
मुल्लूर चक गावातील जंगलात सकाळी ७.४८ वाजताच्या सुमारास ताडोबाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॅा.रविकांत खोब्रागडे, शुटर अजय मराठे, तसेच आरआरटी चमुच्या सदस्यांनी पाळत ठेवून तिला बेशुद्धीच्या इंजेक्शनचा डार्ट मारून बेशुद्ध केले. सदर वाघिणीला तूर्त गोरेवाडा येथील प्राणी संग्रहालयात हलविणार आहे. ही कारवाई वनसंरक्षक रमेशकुमार यांच्या मार्गदर्शनात, वडसा वनविभागाचे उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल, सहायक वनसंरक्षक संदीप भारती, आरमोरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी पवनकुमार जोग यांच्या सहाय्याने पूर्ण केली. यात आरआरटी गडचिरोलीचे दीपेश टेंभुर्णे, योगेश लाकडे, गुरूनानक ढोरे, वसिम शेख, विकास ताजने, प्रफुल वाडगुरे, निकेश शेंद्रे, मनन शेख, वाहन चालक ए.डी.कारपे, ए.एम.दांडेकर यांनी सहभाग घेतला.