गडचिरोली : दीर्घकाळ गुडघेदुखीने त्रस्त असलेल्या एका ज्येष्ठ महिलेवर हेडरी येथील लॉयड्स काली अम्मल मेमोरियल हॉस्पिटल (एलकेएएमएच) येथे पहिली यशस्वी टोटल नी रिप्लेसमेंट (गुडघा प्रत्यारोपण) शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील एका रुग्णालयात अशी शस्रक्रिया करण्याची पहिलीच वेळ असून आरोग्यसेवेच्या क्षेत्रातील हा एक महत्त्वपूर्ण टप्पा मानल्या जात आहे.
अनेक वर्षांपासून गुडघ्याच्या सांध्यात गंभीर झिज झाल्यामुळे संबंधित रुग्ण महिलेला चालणे-फिरणे अत्यंत कठीण झाले होते. चालणे, उभे राहणे तसेच कौटुंबिक आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होणे यांसारख्या दैनंदिन गोष्टी देखील तिच्यासाठी मोठे आव्हान बनल्या होत्या. दुर्गम भागातील अनेक नागरिकांप्रमाणेच प्रगत वैद्यकीय उपचार केवळ मोठ्या शहरांमध्येच उपलब्ध असतात, अशी तिची धारणा होती. शस्त्रक्रियेसाठी घरापासून दूर जाणे हे खर्चिक, कठीण आणि अनिश्चित वाटत होते.
सविस्तर वैद्यकीय तपासणीनंतर लॉयड्स काली अम्मल मेमोरियल हॉस्पिटलच्या अस्थिरोग तज्ज्ञांच्या पथकाने टोटल नी रिप्लेसमेंट शस्त्रक्रियेची शिफारस केली आणि संपूर्ण उपचार प्रक्रियेत आवश्यक वैद्यकीय मदतीचे आश्वासन दिले. समाजाभिमुख आरोग्यसेवेची बांधिलकी जपत रुग्णालयाने ही संपूर्ण शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत केली. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना प्रगत उपचारांपासून दूर ठेवणारा आर्थिक अडथळा दूर झाला.
यशस्वी शस्त्रक्रिया आणि पुनर्वसनानंतर रुग्णाला आता अत्यल्प वेदनांसह आरामात चालता येत असून तिच्या जीवनमानात लक्षणीय सुधारणा झाली आहे. शस्त्रक्रियेनंतर काही दिवसांनी तिने स्वतःच्या पायांवर उभे राहून पहिले पाऊल टाकले. तो क्षण छोटा असला तरी अत्यंत भावनिक होता. अनेक वर्षांनंतर प्रथमच ती पूर्वीप्रमाणे तीव्र वेदनांशिवाय आत्मविश्वासाने आणि सहजतेने चालू शकली.
ही शस्त्रक्रिया गडचिरोलीमध्ये प्रगत अस्थिरोग उपचार सेवा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. यामुळे विशेष उपचारांसाठी रुग्णांना महानगरांमध्ये जाण्याची गरज कमी होणार आहे. लॉयड्स मेटल्सचे व्यवस्थापकीय संचालक बी.प्रभाकरन यांच्या नेतृत्वाखाली रुग्णालय आपल्या वैद्यकीय सुविधा आणि क्षमता सातत्याने बळकट करत असून गडचिरोलीच्या नागरिकांपर्यंत अत्याधुनिक आरोग्यसेवा पोहोचविण्याचे कार्य करत आहे.
































