Home दैनंदिन बातम्या अहेरीतील मारहाण प्रकरणी तीनही आरोपी पोलीस कोठडीत

अहेरीतील मारहाण प्रकरणी तीनही आरोपी पोलीस कोठडीत

धर्मरावबाबांनी घेतली जखमीची भेट

जखमी पांढरे यांची भेट घेताना आ.धर्मरावबाबा आत्राम.
घटनेचा निषेध करताना भामरागड नगर पंचायतचे कर्मचारी

अहेरी : अहेरी नगर पंचायतमध्ये कार्यरत कर अधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी वैभव पांढरे यांच्यावर 10 जून रोजी हल्ला करून त्यांना झालेल्या मारहाण प्रकरणी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्यासह इतर दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. दरम्यान या हल्ल्याचा ठिकठिकाणच्या नगर पंचायत कर्मचाऱ्यांनी निषेध नोंदविला. दरम्यान आ.धर्मरावबाबा आत्राम यांनी जखमी वैभव पांढरे यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. त्यांच्यावर योग्य उपचार करण्याचे निर्देश आरोग्य प्रशासनाला दिले.

गडचिरोलीसारख्या संवेदनशील व दुर्गम जिल्ह्यात सेवा बजावणे एक मोठे आव्हान आहे. अशा ठिकाणी अनेक वेळा मनुष्यबळाची कमतरता असते, संवर्ग अधिकारी व कर्मचारी अत्यल्प संख्येने कार्यरत असतात. तरीही जीवाची पर्वा न करता, कुटुंबापासून दूर राहून, प्रशासनाची जबाबदारी खांद्यावर घेऊन जे अधिकारी-कर्मचारी सेवा देतात, त्यांच्यावर अशा प्रकारचे हल्ले होणे ही दुर्दैवी आणि निंदनीय बाब असल्याचे सांगत कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून या घटनेचा निषेध केला. कर्तव्य बजावत असताना जीवितास धोका निर्माण होत असेल, तर भविष्यात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी निर्भयपणे काम कसे करायचे, असा सवाल या कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला. पीडित सहकाऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे आणि दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

आ.धर्मरावबाबा आत्राम यांची रुग्णालयाला भेट

या घटनेत जखमी झालेल्या वैभव पांढरे यांची आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी रुग्णालयात जाऊन भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली. पांढरे यांना धीर देत त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधून आधार दिला. यावेळी आ.आत्राम यांनी वैभव पांढरे यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी सविस्तर चर्चा केली. सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देऊन, तसेच उपचार प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा होऊ नये, अशा स्पष्ट सूचना त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या. अचानक ओढवलेल्या या संकटामुळे खचून न जाता धैर्याने परिस्थितीचा सामना करण्याचे आवाहन त्यांनी केले. प्रशासनाकडून न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. या भेटीदरम्यान स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर उपस्थित होते.