‘मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो’, म्हणत काढली जनजागृती रॅली

समाजकार्य कॅालेजच्या विद्यार्थ्यांचा पुढाकार

गडचिरोली : जिल्हा निवडणूक अधिकारी, सहाय्यक आयुक्त समाजकल्याण विभाग आणि फुले-आंबेडकर कॅालेज ऑफ सोशल वर्कच्या संयुक्त विद्यमाने मतदार जनजागृतीसाठी गडचिरोली शहरात अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात शहरात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदान जनजागृती रॅली काढण्यात आली.

निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी डॉ.विवेक घोडके यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीची सुरुवात केली. ही रॅली इंदिरा गांधी चौकातून श्री मंगल कार्यालय, सर्वोदय वार्ड, विठ्ठल मंदिर चौक, रोहिदास मंदिर चौक, फुले वार्ड, आशीर्वाद मंगल कार्यालय, हनुमान मंदिर, बाजार वार्ड आणि मुख्य रस्त्यावरून परत इंदिरा गांधी चौकात आली. या रॅलीदरम्यान फुले आंबेडकर समाजकार्य महाविद्यालयाच्या पदवी आणि पदव्युत्तर विभागातील विद्यार्थ्यांनी चौका-चौकात पथनाट्य सादर करून लोकांना मतदानाचे महत्व पटवून दिले.

‘मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो, जन-मनाची पुकार-मतदान आमचा अधिकार,’ अशा घोषणांनी शहर दुमदुमून गेले होते. सहाय्यक आयुक्त समाजकल्याण तथा ‘स्विप’ जिल्हा नोडल अधिकारी डॉ.सचिन मडावी आणि महाविद्यालयाच्या मतदार जागृती अभियानाचे नोडल अधिकारी डॉ.दिलीप बारसागडे यांच्या मार्गदर्शनात या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

रॅलीचा समारोप इंदिरा गांधी चौकातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहासमोर करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॅा.सुरेश खंगार यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले. डॉ.विवेक गोर्लावार यांनी संचालन तर प्रा.दीपक तायडे यांनी आभार मानले.

कार्यक्रमाला फुले-आंबेडकर कॅालेज ऑफ सोशल वर्कच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, समाजकल्याण विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि गडचिरोली शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.