एमडी शानू यांच्या संघाने पटकावले क्रिकेट स्पर्धेतील १ लाख ११ हजारांचे बक्षीस

भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते वितरण

सिरोंचा : तालुका मुख्यालय सिरोंचा येथे भाग्यश्रीताई फॅन्स क्लबतर्फे आयोजित क्रिकेट स्पर्धेत पहिल्यांदाच मोठ्या रकमेची बक्षिसे ठेवली होती. त्यामुळे या स्पर्धेत लगतच्या तेलंगणा आणि छत्तीसगडमधूनही अनेक संघांनी सहभाग नोंदविला. यातील पहिले बक्षीस १ लाख ११ हजार रुपये आणि शिल्ड एमडी शानू यांच्या संघाने पटकावले. बक्षीस वितरण माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्याहस्ते करण्यात आले.

द्वितीय पारितोषिक ५५ हजार ५५५ रुपये आणि शिल्ड रवी रालाबंडीवार यांच्या संघाने पटकावले. अंतिम सामन्यात तेलंगाणा राज्यातील खेळाडूंनी उत्कृष्ट असा खेळ दाखवला.अत्यंत चुरशीच्या लढतीत एमडी शानू यांचा केकेआर संघ विजयी झाला. अंतिम सामना पाहण्यासाठी जवळपास तीन ते चार हजार क्रिकेटप्रेमी उपस्थित होते. सामना आटोपतच भाग्यश्री आत्राम यांच्याहस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष बबलू पाशा, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येरावार, सिरोंचा तालुका अध्यक्ष मधुकर कोल्लुरी, रायुकाँचे अध्यक्ष एम डी शानू, नगरसेवक रंजित गागापुरपवार, राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष व्यंकटलक्ष्मी अरवेली, नगरसेवक जगदीश रालाबंडीवार, नागेश्वर गागापुरपवार, सत्यम पिडगू, रवी रालाबंडीवार, मदनय्या मादेशी, रवी सुलतान आदी मान्यवर उपस्थित होते.