गडचिरोली : महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज (शुक्रवार) दि.23 ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील 26 केंद्रांवर मतदान होणार आहे. जिल्ह्यात नोंदणी असलेले 13 हजार 608 पदवीधर मतदार या मतदानातून आपला प्रतिनिधी (आमदार) निवडणार आहेत. अतिसंवेदनशिल भागात हेलिकॅाप्टरने मतपत्रिका आणि मतदान केंद्रांवरील कर्मचाऱ्यांना कालच पोहोचविण्यात आले. नोंदणीकृत पदवीधर मतदारांनी आपल्या तालुक्यातील मतदानाची वेळ लक्षात घेऊन मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.
या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील एकूण पदवीधर मतदारांमध्ये 9 हजार 310 पुरुष आणि 4 हजार 298 महिला मतदारांचा समावेश आहे. गुरूवारी मतदान साहित्य वाटप केंद्रांवरून मतदान पथके पोलीस बंदोबस्तात आपापल्या मतदान केंद्रांकडे रवाना झाली आहेत.
चार तालुक्यांतील मतदानाच्या वेळेत बदल
भारत निवडणूक आयोगाच्या सुधारित अधिसूचनेनुसार, एटापल्ली, भामरागड, सिरोंचा आणि अहेरी या चार तालुक्यांतील सर्व मतदान केंद्रांवर सकाळी 8 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. या तालुक्यांतील मतदानाची समाप्तीची वेळ दुपारी 4 ऐवजी दुपारी 3 वाजता करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील गडचिरोली, चामोर्शी, देसाईगंज, आरमोरी, कुरखेडा, धानोरा, मुलचेरा आणि कोरची या उर्वरित आठ तालुक्यांत सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होईल. संबंधित मतदारांनी बदललेल्या वेळेची नोंद घेऊन वेळेत मतदान केंद्रांवर उपस्थित राहावे.
गडचिरोली तालुक्यात सर्वाधिक मतदार
जिल्ह्यात गडचिरोली तालुक्यात सर्वाधिक 6 मतदान केंद्रे आणि 3 हजार 416 मतदार आहेत. चामोर्शी तालुक्यात आष्टीसह 4 केंद्रांवर 2 हजार 125, देसाईगंजमध्ये 3 केंद्रांवर 1 हजार 839, आरमोरीमध्ये 3 केंद्रांवर 1 हजार 756, कुरखेड्यात 2 केंद्रांवर 1 हजार 288 आणि अहेरीमध्ये 2 केंद्रांवर 1 हजार 120 मतदारांची नोंदणी आहे.
धानोरा, मुलचेरा, एटापल्ली, सिरोंचा, कोरची आणि भामरागड या तालुक्यांत प्रत्येकी एक मतदान केंद्र आहे. धानोरा येथे 478, मुलचेरा येथे 414, एटापल्ली येथे 354, सिरोंचा येथे 327, कोरची येथे 292 आणि भामरागड येथे 199 मतदार आहेत.
38 उमेदवार रिंगणात, कर्मचाऱ्यांना सवलत
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या सहा जिल्ह्यांचा समावेश आहे. निवडणुकीत एकूण 38 उमेदवार रिंगणात आहेत. नोंदणीकृत पदवीधर मतदार असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना मतदानासाठी विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्यात आली आहे. तसेच खासगी आस्थापनांमध्ये कार्यरत असलेल्या नोंदणीकृत पदवीधर मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी चार तासांची विशेष सवलत देण्याचे निर्देश निवडणूक प्रशासनाने दिले आहेत.
27 ऑक्टोबर रोजी मतमोजणी
मंगळवार, दि.27 ऑक्टोबर रोजी नागपूर येथील विभागीय क्रीडा संकुल, मानकापूर येथे मतमोजणी होणार आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया दि.31 ऑक्टोबरपूर्वी पूर्ण केली जाणार आहे. जिल्ह्यातील सर्व नोंदणीकृत पदवीधर मतदारांनी मतदानात सहभागी व्हावे. विशेषतः एटापल्ली, भामरागड, सिरोंचा आणि अहेरी तालुक्यांतील मतदारांनी दुपारी 3 वाजेपर्यंत असलेली मतदानाची वेळ लक्षात घेऊन नियोजन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.
































