गडचिरोली : जिल्ह्याच्या राजकारणातील एक महत्वाचा विधानसभा मतदार संघ असलेल्या आरमोरी मतदार संघात गेल्या दोन निवडणुकांमध्ये भाजपचे कृष्णा गजबे यांनी एकतर्फी विजय मिळविला. यावेळी हॅटट्रिक साधण्यासाठी त्यांची तयारी सुरू झाली आहे. दुसरीकडे त्यांना टक्कर देणारा सक्षम उमेदवार म्हणून काँग्रेसकडून नवीन चेहरा समोर केला जाण्याची शक्यता आहे. तो चेहरा नेमका कोण असेल याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
महाविकास आघाडीत हा मतदार संघ काँग्रेसच्या वाट्याला येणार असल्याचे बोलले जाते. कारण आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे या मतदार संघातील अस्तित्व नगण्य आहे. शिवसेना (उबाठा) या मतदार संघासाठी प्रबळ दावेदार आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष (आरमोरी क्षेत्र) सुरेंद्रसिंह चंदेल यांचे नाव पक्षाकडून पुढे केले जाऊ शकते. पण भाजपसारख्या बलाढ्य पक्षाला टक्कर देताना त्यांची ताकद किती पुरेल, असा विचार करून ही जागा काँग्रेस आपल्याकडे खेचण्यात यशस्वी होऊ शकते. अशा स्थितीत काँग्रेस चांगल्या प्रतिमेच्या नवीन उमेदवाराला संधी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सलग दोन वेळा काँग्रेसचे आमदार म्हणून प्रतिनिधीत्व करणाऱ्या आनंदराव गेडाम यांना गेल्या दोन निवडणुकांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. पुढील निवडणुकांमध्ये आपली दावेदारी कायम ठेवायची असेल तर झालेल्या चुका दुरूस्त करून आपली प्रतिमा अधिक उजळ करण्याचा प्रयत्न त्यांनी करणे गरजेचे होते. मात्र त्यादृष्टिने त्यांनी विशेष प्रयत्न केलेले दिसत नाहीत. दुसरीकडे हळूहळू जनसंपर्क वाढवून आपली दावेदारी प्रबळ करण्यासाठी किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वामनराव सावसाकडे आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी यांनी आगेकुच सुरू केली आहे. सावसाकडे यांची प्रतिमा चांगली असली तरी पैसे खर्च करताना ते हात आखडता घेतात, असा कार्यकर्त्यांचा अनुभव आहे. त्यामुळे त्यांना कार्यकर्त्यांची साथ किती मिळेल याबद्दल शंका उपस्थित केली जाते. त्या तुलनेत अजातशत्रू व्यक्तिमत्वाचे धनी असलेले मनोहर पाटील पोरेटी हे आवश्यक तिथे पैसे खर्च करताना मागेपुढे पाहात नाही. पाटीलकीचा तोरा न मिरवता नम्रपणे वागत असल्यामुळे काँग्रेसमधील इतर दावेदारांच्या तुलनेत पक्षासाठी ते सरस ठरू शकतात, असे या मतदार संघातील कार्यकर्त्यांना वाटते.
विशेष म्हणजे आरमोरी मतदार संघात भाजपकडून कृष्णा गजबे यांच्याशिवाय दुसरा दावेदार सध्यातरी पुढे आलेला नाही. गॅाडफादर असलेल्या सावकार परिवाराचा वरदहस्त आहे तोपर्यंत त्यांच्या खुर्चीला धक्का लागण्याची शक्यताही नाही. जोडीला त्यांच्या नम्र स्वभावाचा त्यांना चांगला फायदा झालेला आहे. त्यामुळे त्यांच्याशी लढत देऊ शकणारा, त्यांच्याच सारख्या स्वभावाचा उमेदवार म्हणून मनोहर पाटील पोरेटी यांचे नाव पुढे येण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.