जिल्ह्यात न्युमोनियामुळे सर्वाधिक बालमृत्यू, जनजागृतीसाठी राबविणार ‘सांस’ मोहिम

काय आहेत लक्षणे, काय उपाययोजना, वाचा

गडचिरोली : हिवाळ्याला सुरूवात झाली की 0 ते 5 वर्ष वयोगटातील बालकांमध्ये न्युमोनियाचे प्रमाण वाढते. अलिकडे न्युमोनियामुळे सर्वाधिक बालमृत्यू होत आहेत. हे मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी न्यूमोनिया प्रतिबंधक उपाययोजना आणि व्यापक जनजागृती केली जाणार आहे. त्यासाठी आरोग्य विभागाकडून जिल्हाभर ‘सांस’ ही माेहिम राबविली जात आहे.

गडचिरोलीत या मोहिमेचा शुभारंभ जिल्हा परिषदेच्या सीईओ आयुषी सिंह यांच्या हस्ते महिला व बाल रुग्णालयात करण्यात आला. न्युमोनियाची लक्षणे वेळीच ओळखून इलाज केल्यास या आजारात मृत्यू टाळता येतो. त्यासंदर्भातच या मोहिमेत जनजागृती केली जाणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॅा.दावल साळवे यांनी सांगितले. 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत ही जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे.

सदर मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी महिला व बाल रुग्णालयाच्या प्र.अधीक्षक डॉ.माधुरी किलनाके, निवासी बाहयरुग्ण वैद्यकिय अधिकारी डॉ.बागराज धुर्वे, बालरोग तज्ज्ञ डॉ.प्रशांत पैदाम, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रशांत पैदाम, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ.रूपेश पेंदाम, गडचिरोलीचे तालुका आरोग्य अधिकारी डॅा.अमित साळवे, महिला व बाल रुग्णालय येथील अधिकारी व कर्मचारी तसेच शहरी विभागातील आशा कार्यकर्त्या व लाभार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन विनोद सोनकुसरे, यांनी तर आभार माता बाल संगोपन अधिकारी डॉ.प्रफुल्ल मुलके यांनी मानले.

ही आहेत लक्षणे आणि उपाय

न्यूमोनियाचा संसर्ग झालेल्या चालकांना खोकला येणे, श्वासोच्छवास वेगाने होणे, छाती आत ओढणे, ताप येणे अशी लक्षणे असतात. न्यूमोनिया आजाराची लक्षणे ओळखून तात्काळ उपचार घेतल्यास हा आजार पूर्णपणे बरा होतो. न्युमोनिया टाळण्यासाठी बालकांना 6 महिने निव्वळ स्तनपान करावे. आपल्या बाळाचे ठराविक वयोगटात (पहिला डोज 6 आठवडे, दुसरा 14 आठवडे, बुस्टर डोज 9 व्या महिन्यात याप्रमाणे) न्युमोकोकल कॉन्गुगेट व्हॅक्सिन घेतले आहे काय याची खात्री करावी. आरोग्य केंद्रात जाऊन बाळाचे संपूर्ण लसीकरण करुन घ्यावे. सदर मोहीमेत आशा घरोघरी जावून समुपदेशन करणार आहे. न्युमोनिया आजाराविषयी असलेले गैरसमज व चुकीच्या कल्पना दूर करुन न्यूमोनिया प्रतिबंधाकरिता आवश्यक सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.