काँग्रेसचे ‘फोडा आणि झोडा’चे धोरण, मंत्री रामदास आठवले यांचा आरोप

संविधान बदलविण्याची भिती गैरसमजातून

गडचिरोली : भाजपने या लोकसभा निवडणुकीत ४०० वर खासदार निवडून आणण्याचा संकल्प करण्यामागे संविधान बदलले जाण्याची भिती काँग्रेसकडून पसरविली जात आहे. परंतू असे करण्यामागे केवळ गैरसमज निर्माण करणे हा उद्देश असून कोणीही संविधान बदलवू शकत नाही. काँग्रेस ‘डिव्हाईड अॅन्ड रूल’, अर्थात फोडा आणि झोडा या धोरणानुसार वागत आहे, असा आरोप रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे नेते तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला.

ते मंगळवारी गडचिरोलीत प्रसार माध्यमांशी बोलत होते. यावेळी महायुतीचे उमेदवार खा.अशोक नेते, आ.डॅा.देवराव होळी, लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे, गोवर्धन चव्हाण, रिपाइंचे नेते विजय आगलावे, प्रशांत खोब्रागडे, प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी ना.आठवले यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांची उत्तरे देताना संविधान बदलविण्यासंदर्भात विधान करणारे कर्नाटकमधील भाजप खासदार हेगडे यांच्यावर भाजपने कारवाई केली आहे. त्यांचे लोकसभेचे तिकिटही कापले असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यात लोकसभा निवडणुकीत रिपाइंला योग्य वाटा मिळाला नसला तरी विधानसभा निवडणुकीत ७ ते ८ जागा देण्याचे आश्वासन भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला दिले असल्याचे आठवले म्हणाले.