आरमोरी : स्वातंत्र्यलढ्याशी संबंध नसलेले राष्ट्रभक्त म्हणवून घेत देशावर राज्य करताहेत. हे डुप्लिकेट राष्ट्रभक्त आहेत, अशी टिका विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. गेल्या 10 वर्षात या परिसरात काय बदल झाला? शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले का, रोजगार दिला का, उद्योग आले का, असे प्रश्न उपस्थित करत त्यांनी केंद्र सरकारवर टिकास्र सोडले. वडधा येथे मंगळवारी संध्याकाळी झालेल्या महाविकास आघाडीच्या प्रचारसभेत ते बोलत होते.
यावेळी ना.वडेट्टीवार म्हणाले, मोदी ज्या शाळेत शिकले ती शाळा काँग्रेसच्या काळात बांधल्या गेली आहे. ज्या रेल्वे स्टेशनवर त्यांनी चहा विकला ते स्टेशनही काँग्रेसच्या काळात बांधले आहे. ज्या विमानतळावरून ते फिरतात ती विमानतळंही काँग्रेसने बांधलेली आहेत. पण हे सर्व विकण्याचे काम मोदी सरकारने केले आहे. दोघे विकणारे आणि दोघे घेणारे असे चौघेही गुजरातचे आहेत, अशी टिका त्यांनी केली.
पेट्रोल-डिझेलचे भाव वाढविल्याने महागाई सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर नेली. सिलिंडरचे भाव 400 वरून 1200 वर नेले. आम्ही पर्मनंट नोकऱ्या देत होतो. हे कंत्राटी नोकऱ्या देत आहेत. मधल्या काळात आम्ही सत्तेवर असताना या जिल्ह्यात आदिवासींचे आरक्षण कमी न करता मी ओबीसींचे आरक्षण 6 वरून 17 टक्क्यांवर नेले होते. वेळीच सावध न झाल्यास 3 टक्के लोक देशावर राज्य करतील. स्वातंत्र्याची दुसरी लढाई बहुजनांना आपल्या हक्कासाठी लढावी लागेल, असे म्हणत त्यांनी डॅा.नामदेव किरसान यांना निवडून देण्याचे आवाहन केले.
या सभेला माजी डॅा.किरसान, आ.आनंदराव गेडाम, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, शिवसेनेचे (उबाठा) जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, गडचिरोलीचे माजी नगराध्यक्ष राम मेश्राम, मनोहर पा.पोरेटी, राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप ठाकूर, अमोल मारकवार, डॅा.महेश कोपुलवार, वामनराव सावसाकडे, मुनिश्वर बोरकर यांच्यासह इतर अनेक पदाधिकारी उपस्थित होते.