गडचिरोली : भाजपा तालुका व शहराच्या वतीने खासदार अशोक नेते यांच्या जनसंपर्क कार्यालयात भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांच्या अध्यक्षतेखाली संविधान दिनानिमित्त उद्देशिका वाचन व मन की बात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मंचावर किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, जिल्हा उपाध्यक्ष स्वप्निल वरघंटे, ओबीसी मोर्चाचे जिल्हा महामंत्री भास्कर भुरे, तालुका अध्यक्ष आनंद भांडेकर, शहर अध्यक्ष सोपान नैताम, रेवनाथ कुसराम, गणेश नेते, रोशनी वरघंटे, संजय खेडेकर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भारतमातेच्या व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व संविधान दिनानिमित्त संविधान उद्देशिका वाचन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना प्रशांत वाघरे म्हणाले, जगातील सर्वोत्कृष्ट राज्यघटना म्हणून भारतीय राज्यघटनेकडे पाहिले जाते. समर्थ भारताच्या भविष्याचा वेध घेऊन, उपयुक्त तसेच अडथळा ठरू शकतील अशा सर्व बाबींचा विचार करून अनुरुप संवैधानिक तरतुदींचा घटनेत समावेश करण्यासाठी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून अथक परिश्रम घेतले. संविधान देशाला एकसंघ ठेवणारी आणि देशवासीयांच्या शिक्षणापासून ते त्यांच्या भौतिक आणि आत्मिक उन्नतीसाठी प्रभावी उभारणी करणारी प्रेरक शक्ती असून भारतीय संविधान हे संविधानिक जीवन जगण्याचा मार्ग असल्याचे प्रतिपादन वाघरे यांनी केले.
कार्यक्रमाचे संचालन रमेश अधिकारी, प्रास्ताविक जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम तर आभारप्रदर्शन तालुका अध्यक्ष आनंद भांडेकर यांनी केले.